Pune Crime News : ‘माजी नगरसेवक आहे’ म्हणत महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा

एमपीसी न्यूज – “मी माजी नगरसेवक आहे” असे म्हणत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ व धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी दोन आरोपीविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनजंय जाधव व एक अनोळखी इसम विरुद्ध कलम 353, 332, 504, 504 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, महावितरणच्या पर्वती विभाग अंतर्गत नवी पेठ शाखा कार्यालयाचे कर्मचारी सफल शांताराम आताग्रे हे सहकारी सुनील संतोष कोळी यांच्यासमेवत शुक्रवारी (दि.13) पीएमसी कॉलनी, साने गुरुजी वसाहत, आंबिल ओढा येथे वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत होते. दुपारी 12.30 च्या सुमारास तीन थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर हे दोन्ही कर्मचारी व्ही. के. जाधव नामक थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते.

एका महिलेने फोन केल्यानंतर त्याठिकाणी आलेल्या धनजंय जाधवने ‘मला ओळखत नाही का, मी माजी नगरसेवक आहे. तू कोणाच्या दारात आला आहे’, असे म्हणत व शिवीगाळ करीत एका अनोळखी इसमाच्या साथीने कर्मचारी सफल आताग्रे यांच्या पोटावर व डोक्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच शासकीय गणवेश फाडून टाकला. दुसरे कर्मचारी सुनील कोळी यांनी आताग्रे यांना दोघांच्या तावडीतून सोडवले व प्रकाराची वरिष्ठांना माहिती दिली. त्या ठिकाणी नवीपेठ व पेशवेपार्क कार्यालयातील अधिकारी गेल्यानंतर त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.