Pune News : खुन्नस का देतोस ? जाब विचारून तरुणावर प्राणघातक हल्ला

येरवड्यातील घटना

एमपीसी न्यूज : ‘मागच्या आठवड्यात तू मला खुन्नस का दिली होतीस’ असा जाब विचारून 18 वर्षे तरुणावर तिघा जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केला. पुण्याच्या येरवडा परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ बुधवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. 

याप्रकरणी तेजस नितीन धुमाळ (वय 18) यांनी फिर्याद दिली असून येरवडा पोलिसांनी अभय चंद्रकांत जंगले (वय 18) निहाल विशाल माचरे (वय 19) आणि आदित्य घमरे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यातील पहिल्या दोन आरोपींना अटकही केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील शिवाजी पुतळ्या समोर मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. तर आरोपी अभय जंगले याने ‘ तुला खूप मस्ती आली आहे, मला गेल्या आठवड्यात तू खुन्नस दिली होती’ असे बोलून ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने त्याच्या डोक्यावर आणि हातावर वार केले. यामधील फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येरवडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.