Lonavala : ॐकार तरुण मंडळ यांच्या माध्यमातून कसबे दिग्रज मधील ३५० पूरग्रस्त कुटुंबाला मदत

एमपीसी न्यूज – सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात न भूतो न भविष्यती अशी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने हजारो कुटुंब या अस्मानी संकटात विस्थापित झाली. अनेकांची घरदारं, शेती, पशुधन या पुराच्या पाण्यात वाहून गेले. अशा पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा संकल्प करीत तुंगार्ली येथील ॐकार तरुण मंडळ यांच्या माध्यमातून मिरज तालुक्यातील कसबे दिग्रज या गावातील ३५० पूरग्रस्त कुटुंबाला मदत पोचविण्यात आली.

पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सोबतच अनेक सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक पातळीवर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र, अजूनही अशी अनेक गावं आहेत, ज्याठिकाणी कसल्याही प्रकारची मदत पोचलेली नाही. असं एखादं गाव शोधून त्याठिकाणी स्वतः जाऊन मदत देण्याचा संकल्प ॐकार तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानुसार प्रत्येक कुटुंबासाठी ५ किलो तांदूळ, ५ किलो आटा, साखर, तेल, तूरडाळ, हरबरा हे प्रत्येकी एक किलो, चहा पावडर, कपड्याचे आणि आंघोळीचे साबण, मिरची पावडर, हळद पावडर, मेणबत्ती पाकीट, माचीस बॉक्स, अर्धा किलो मीठ, दूध पावडर, फिनेल, ओडोमोस, ब्लँकेट, चादर, टॉवेल, दोन नवीन साड्या, कांदे, बटाटे,  बिस्कीट, ब्रेड, टोस्ट यासारख्या एकूण ३० वस्तूंचा समावेश असलेले एक किट तयार करण्यात आले. आणि असे ३५० किट कृष्णा नदीला आलेल्या पुराच्या विळख्यात विस्थापित झालेल्या कसबे दिग्रज या गावातील ३५० कुटुंबांना मदत म्हणून देण्यात आले.

नदी सोबत वाहून आलेल्या गाळाच्या खाली झाकले गेलेलं रस्ते, वाहून आलेले कचऱ्याचे ढीग, काही ठिकाणी पसरलेली दुर्गंधी या अशा अत्यंत खडतर परिस्थितीत ॐकार तरुण मंडळाच्या ५० कार्यकर्त्यांनी सदर मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला. याकामी दिग्रज गावातील स्थानिक जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य आनंदराव नलवडे, माजी सरपंच स्वप्निल नलवडे, शुभम लाड, अजय चव्हाण, निखील तेली यांनी मोलाची मदत केली. शिवाय ॐकार तरुण मंडळाला या मदतीसाठी लोणावळा बाजार, ॐकार महिला विंग, गोल्ड व्हॅली गणेश मित्र मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ, गणेश बालमित्र मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळ (पुणे) यांच्यासह ॐकार तरुण मंडळाच्या सभासदांनी तसेच तुंगार्लीकर ग्रामस्थांनी वैयक्तिक पातळीवर भरीव अशी मदत दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.