Pimpri News : सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर यांची मुंबईत बदली

एमपीसी न्यूज – कोरोना काळात उल्लेखनीय काम करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर यांची मुंबईत बदली झाली. एलबीटीची जुनी प्रकरणे निकाली काढून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. पिंपरी विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी पुणे जिल्ह्यात उत्कृष्ट स्वीप कार्यक्रम अलमलेकर यांनी राबविला.

सोलापूर जिल्ह्यातून राज्यकर विभागातून 26 जुलै 2019 रोजी सुनील अलमलेकर यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने बदली झाली होती. त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) विभागाची जबाबदारी देण्यात आली. एलबीटीची अनेक प्रकरणे प्रलंबित होती. मोठ्या मोठ्या औद्योगिक कंपन्याची अशी 5 हजार प्रकरणे त्यांनी मार्गी लावली. 400 कोटीचा एलबीटी कर वसूल करण्याची प्रक्रिया  पूर्ण केली. यामुळे आता पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. एलबीटी उत्पन्नाच्या आधारे सरकारकडून पालिकेला जीएसटीचे अनुदान मिळते. अनुदान, स्टॅम्प ड्युटीचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महापालिका आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत बालेवाडीत कोविड केअर सेंटर चालू केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नेहरूनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. कोरोना वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांना दिलासा देत होते. वायसीएम रुग्णालयातही मुख्य समन्वयक म्हणून अलमलेकर यांनी काम पाहिले. पिंपरी विधानसभा 206 मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून उत्तम काम केले. पुणे जिल्ह्यात उत्कृष्ट स्वीप कार्यक्रम त्यांनी राबविला.

महापालिकेतील दोन वर्षांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्याने त्यांची वस्तू व सेवा कर (जीएसटी) या मूळ विभागात मुंबईला बदली झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दोन वर्षांच्या कारकिर्दीबाबत समाधानी असल्याचे अलमलेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.