Astro lover Sushant: खगोलप्रेमी सुशांतला इन्टरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटीची देखील श्रद्धांजली

Astro lover Sushant: International Space University also pays tribute to Astro lover Sushant सुशांत 'चंदा मामा दूर के' या चित्रपटामधील भूमिकेसंदर्भात संशोधन करण्यासाठी 2017 साली नासामध्येही जाऊन आला होता. त्याने चंद्रावर एक प्लॉटही विकत घेतला होता.

एमपीसी न्यूज – आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा गुणी अभिनेता सुशांतसिंह राजपूतने गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर त्याचे अनेक पडसाद आजही उमटत आहेत. मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याचे वेगळे गुण प्रकाशझोतात येत आहेत. सुशांतचे स्पेस सायन्सचे प्रेम यानिमित्ताने उघड झाले.

फ्रान्समधील ‘द इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी’ने (ISU) अभिनेता सुशांतसिंह राजपूतला श्रद्धांजली वाहिली आहे. माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र याबद्दल सुशांतला विशेष प्रेम होतं. सुशांतने अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांशी संवादही साधला होता. तो फ्रान्समधील ‘इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी’मध्येही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येणार होता असं विद्यापीठाने त्याला वाहिलेल्या श्रद्धांजलीमध्ये म्हटलं आहे. विद्यापीठाच्या वेबसाईटवर सुशांतला श्रद्धांजली वाहणारे अधिकृत पत्रक पोस्ट करण्यात आलं आहे.

ट्विटरवरुनही सुशांतचा फोटो पोस्ट करत लोकप्रिय भारतीय अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूची बातमी अत्यंत दु:खद आणि वेदनादायी आहे. सुशांत हा विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग आणि गणिताच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणारा होता. तो आमच्या विद्यापीठाच्या कामासंदर्भात माहिती घेत असायचा असं नमूद करण्यात आलं आहे.

तर वेबसाईटवरील श्रद्धांजलीमध्ये सुशांत 2019 साली विद्यापीठाला भेट देणार होता, मात्र वेळेचे नियोजन न झाल्याचे त्याला भेट देता आली नाही असंही म्हटलं आहे. फिजिक्स ऑलिंपियाडचा विजेता असलेला सुशांत ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटामधील भूमिकेसंदर्भात संशोधन करण्यासाठी 2017 साली नासामध्येही जाऊन आला होता. त्याने चंद्रावर एक प्लॉटही विकत घेतला होता. त्याच्याकडे असलेल्या 14 इंचांच्या एलएक्स 600 या अत्याधुनिक दुर्बिणीतून तो या प्लॉटचे निरीक्षण करत असे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.