Pune : पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहात अखेर कामकाजाला सुरुवात 

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमधील सभागृहाच्या निकृष्ट कामाबाबत अनेक वादानंतर आज अखेर कामकाजाला सुरुवात झाली.या विषयी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की,पुणे महानगरपालिकेचे नव्या इमारतीमधील काही कामे पूर्ण करण्यास तीन महिन्याचा कालावधी लागला असून ती सर्व कामे पूर्ण झाली आहेत.गणेशोत्सवाचा मुहूर्त पाहून सभागृहाचे कामकाज सुरू केले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्या उभारण्यात आलेल्या इमारतीचे 21 जून रोजी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या उदघाटनच्या कार्यक्रमा दरम्यान सभागृहातील छत पावसाच्या पाण्याने गळत होता. त्यावरून पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर विरोधकांनी सभागृहाचे अर्धवट काम सुरू असताना आणि इमारतीमधील कोणत्याही मजल्यावर काम पूर्ण झाले नसताना एवढ्या लवकर उदघाटनाची घाई का केली अशा शब्दात राष्ट्रवादी, कॉंग्रेस,शिवसेना आणि मनसेकडून सडकून टीका देखील करण्यात आली होती.

त्यावरून सताधारी पक्षाकडून या सभागृहाच्या वादावर पडदा टाकण्याचे काम करीत लवकरच सभागृहाचे काम पूर्ण होईल आणि तेथून कामकाज सुरू होईल असे सांगण्यात आले.त्यानंतर तब्बल 3 महिन्यानंतर आज पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकानी सभागृहात भगवे फेटे घालून प्रवेश केला.त्यानंतर सभागृहात भारतीय संविधानाचे वाचन उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी केले.त्यानंतर या कामकाजाला सुरुवात झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.