Nigdi : अटलबिहारी वाजपेयी व्यक्ती नव्हे विचार

प्राधिकरण येथे अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार सर्वांनी आचरणात आणायला हवे. त्यांच्या जाण्याने भारताच्या सर्वच क्षेत्रांमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काही व्यक्ती वैचारिक पातळीवर अतिशय प्रगल्भ असतात. त्या पातळीवर ते व्यक्ती न राहता विचार बनून जातात. अटलबिहारी वाजपेयी हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. पक्ष, राजकारण यांच्या पलीकडे त्यांचे व्यक्तिमत्व होते, अशा भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक तसेच राजकीय, सामाजिक,  सांस्कृतिक, आध्यत्मिक, सहकार, शिक्षण क्षेत्रातील पदाधिका-यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली सभेसाठी खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, राज्य शिवसेना संघटक गोविंद घोळवे, महापौर राहुल जाधव, विरोधी पक्षनेते एकनाथ पवार, माजी महापौर नितीन काळजे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा साळवे, आझम पानसरे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, अमित गोरखे, अॅड. सतीश गोरडे, अजित जगताप, मधू जोशी, गजानन चिंचवडे, वामनराव अभ्यंकर, भाऊसाहेब भोईर, सचिन साठे, डॉ. गिरीश आफळे आदी उपस्थित होते.

त्याचबरोबर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मनसे, महाराष्ट्र शाहीर परिषद, चापेकर स्मारक समिती, जनसेवा बँक पुणे, पिंपरी चिंचवड बार असोसिएशन, पतंजली, अखिल भारतीय नाट्य परिषद, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, अखिल भारतीय वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी संस्थांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “अटलबिहारी वाजपेयी यांच्याबाबत संगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यांच्याबद्दलच्या आठवणी जाग्या करत असताना त्यांचे विचार सुद्धा अवलंबिण्याची गरज आहे. कर्तृत्वसंपन्न नेतृत्व या संपूर्ण देशाने त्यांच्या रुपात पाहिले आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे. विरोधक असताना सत्ताधा-यांवर योग्य अंकुश ठेवला आहे. त्यांचे विचार समाजात पसरविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल.”

खासदार अमर साबळे म्हणाले, “अस्पृश्यता ही मानवनिर्मित आहे, ईश्वर निर्मित नाही. जर ती ईश्वर निर्मित असेल तर अशा देवाला मी मानत नाही. असे उद्गार अटलबिहारी वाजपेयी यांनी काढले होते. सर्व पातळ्यांवरील सर्वमान्य नेता म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची ओळख आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

आमदार महेश लांडगे म्हणाले, “लहान असताना भोसरी येथे अटलबिहारी वाजपेयी यांची एक सभा झाली होती. त्यावेळी खूप लहान होतो. पण तरीही त्यांची सभा ऐकण्यासाठी गेलो. त्यांच्या भाषणाची आजही आठवण होते. ते अजातशत्रू होते. कोणत्याही क्षेत्रात त्यांचे शत्रू नव्हते. ते प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत असत. त्यांच्या म्हणण्यावर विचार, सल्लामसलत करून तोडगा काढण्याचे काम करीत असत. त्यांनी कधीही व्यक्तिद्वेष केला नाही. अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “राजकारणातला प्रत्येक माणूस पावलापावलावर कलंक लावून घेतो. पण तब्बल पाच दशकांहून अधिक कालावधी राजकारणात असून ते निष्कलंक राहिलेले एकमेव उदाहरण आहे. त्यांच्यासारखा एखादा दिवस जरी आपल्याला जगता आला तर आपल्या जीवनाचे सार्थक होईल. त्यांनी घरात राजकारण आणि राजकारणात घर कधीच येऊ दिले नाही.

महापौर राहुल जाधव म्हणाले, “अटलबिहारी वाजपेयी यांचं भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर कणखर देश म्हणून ठेवण्यासाठी मोठं योगदान आहे. त्यांचे विचार सर्व स्तरावर राबविणे गरजेचे आहे. त्यांना महापालिकेतर्फे श्रद्धांजली वाहण्यासाठी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात येणार आहे. त्याबाबतचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे.

मधू जोशी, “माझ्या देव्हाऱ्यातला देव गेल्याची भावना आज वाटत आहे. वाजपेयी माझा आयडॉल होते. या देव्हाऱ्यातला देव गेला आता या गाभाऱ्यात त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मी राजकारणात येणार असल्याची भविष्यवाणी त्यांनी परळी येथील एका सभेत केली होती. त्यांची भविष्यवाणी पुढे जाऊन खरी ठरली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.