Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये अटलजी यांना आदरांजली

एमपीसी न्यूज – ‘हार नहीं मानूँगा, रार नहीं ठानूँगा, ‘काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ। गीत नया गाता हूँ।  या आपल्या कवितेसारखं निडर जीवन जगणारे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे आज (गुरुवारी) निधन झाले. पिंपरी-चिंचवड शहरातून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.  

राजकारणातील सुसंस्कृत महाऋषी हरपला – आमदार लक्ष्मण जगताप

भारताच्या राजकारणातील कवी मनाचा अजातशत्रू, सुसंस्कृत राजकारणी असलेल्या अटलबिहारी वाजपेयी नावाच्या महापर्वाचा अस्त झाला आहे. त्यांच्या निधनाने भारताच्या राजकारणाची मोठी हानी झाली आहे. भारतीय जनता पक्षाला देशाच्या राजकारणात आजचे स्थान मिळवून देण्यात अटलबिहारी वाजपेयी यांचे मोठे योगदान राहिले आहे. राजकारणात आपल्या विरोधकांशी कितीही मतभेद असले आणि विरोध असला तरी राजकारणातील सभ्यता तसेच सुसंस्कृतपणा कसा जपावा, हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेकदा दाखवून दिले आहे. ते राजकारणातील महाऋषी होते.

त्यांच्या निधनाने देशाच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. अशा या राजकीय सभ्यतेच्या महामेरूला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. राजकारणात व्यक्तीद्वेष न ठेवता देशाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन शेवटपर्यंत मार्गक्रमण केलेल्या या महामेरूच्या निधनामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा, असे आवाहन भाजपच्या मी वतीने करत आहे.

संसदीय लोकशाहीची, देशाची प्रचंड हानी – एकनाथ पवार

भाजपचे जेष्ठ नेते , माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे  निधन झाले हे अजूनही खरे वाटत नाही. अटलजींच्या रूपाने देशाने एक खंबीर, कणखर तसेच इमानदार प्रामाणिक आणि सच्चा नेता गमावला आहे. अटलजी आमच्या हृदयात. सदैव राहतील.  ते सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी होते. तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व लहान-मोठ्या घटक दलांच्या हातात हात घालून त्यांनी सरकार पुढे नेले. ते भारतीय राजकारणाची प्रेरणा होती. अटलजींच्या जाण्याने संसदीय लोकशाहीची, देशाची प्रचंड हानी झाली.  त्यांच्या महान व्यक्तिमत्वास सांष्टांग दंडवत घालून भाजपतर्फे आदरांजली वाहत आहे, असे सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले.

बहुआयामी व्यक्तिमत्व हरवले – उमा खापरे

कवी, साहित्यिक आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (वय 93) यांनी आज एम्समध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. अटल बिहारी वाजपेयी यांचा पत्रकार, कवी ते पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. आज देशात जे काही भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे; त्यामागे वाजपेयी यांचे मोलाचे कार्य आहे. त्यांनीच भाजपचा विस्तार केला. कुशाग्र बुद्धिमता आणि लोकशाही तत्वांशी असलेली बांधिलकी असलेले नेते, कवी, साहित्यिक, पत्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख राहिली असा नेता पुन्हा होणे नाही, असे महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या जेष्ठ नेत्या उमा खापरे म्हणाल्या.

विलोभनीय व्यक्तिमत्व गमावले – मानव कांबळे

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. एक कवी मनाचे पर॔तु तरीही कणखर, एका पक्षाचे तरीही सर्व पक्षीयांच्या हृदयामध्ये स्थान असलेले एक विलोभनीय व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. खरंच एका काळाचा अंत झाला आहे असे स्वराज अभियान, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मानव कांबळे म्हणाले.

अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त आघाडीचे सरकार कसे चालवावे याचे उत्कृष्ट उदाहरण 1999 ते 2004 या काळात देशाला घालून दिले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांच्या मताचाही त्यांनी कायम आदर केला. देशातील सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी त्यांनी कायम प्राथमिकता दिली. आजच्या विध्वंसक व द्वेषाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर  अटलबिहारी वाजपेयी यांच्या सर्वव्यापी राजकारणाची कमी कायम जाणवत राहील. त्यांच्या निधनाने देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

सोशल मीडियावरून तरूणाई भावूक

व्हॉट्सअप,  फेसबुकवर तसेच इतर सोशल साईटवर अटल बिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने तरुणाई भावूक झालेली पहायला मिळाली. व्हाट्सअपचे डीपी स्टेटस “अटल”मय झाले होते. फेसबुकवरही अटलजींच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे.

महामार्ग जोडल्याने देशाची आर्थिक स्थिती भक्कम – महापौर राहुल जाधव

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे केवळ भाजपचे नाही तर, संपूर्ण देशाची मोठी हानी झाली आहे. वाजपेयींनी देशात प्रमुख महामार्ग बनवून ती जोडण्याची योजना राबविल्याने वाहतुक सुरळीत होऊन अनेक मोठी शहर एकमेकांना जोडली गेली आहेत. परिणामी बाजारपेठा जोडल्या जाऊन, देशातील आर्थिक स्थिती बळकट होत गेली. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या वतीने मी त्यांना आदरांजली अर्पण करीत आहे, असे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी असा नेता – आमदार महेश लांडगे

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी विविध अंगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी असे मोठं नेतृत्व देशाने गमावले आहे. देशहित हेच त्यांचे पहिले प्राधान्य होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशासाठी भरीव योगदान दिलं. १९९१ मध्ये भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि वाजपेयींच्या काळात त्याला गती देण्यात आली. पंतप्रधान म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. वाजपेयींच्या निधनानं देशात प्रत्येक नागरिक हळहळ व्यक्त करत असून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करतो.

देशाने खंबीर, कणखर, प्रामाणिक आणि सच्चा नेता गमावला – बाळासाहेब गव्हाणे

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे खंबीर, कणखर, प्रामाणिक, इमानदार आणि सच्चा नेते होते. भाजपच्या उभारणीतील एक अग्रगण्य व्यक्तीमत्व ते होते. 1 मे 1988 रोजी अमेरिकसह विविध विकसित देशाचा रोष पत्करुन पोखरणीचे अनुचाचणी घेण्यात त्यांनी पंतप्रधान म्हणून महत्वाची भुमिका बजावली होती. कारगील युद्ध देखील त्यांच्याच कार्यकाळात झाले होते. त्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर पाकिस्तानने आजपर्यंत युद्ध करण्याचे धाडस केले नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी त्यांनी बस देखील सुरु केली होती.  सहृदयी, कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी विविध अंगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी असे मोठं नेतृत्व देशाने आज गमावले आहे. त्यांच्या निधनाने भारताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे निधन झाल्याने आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर दु:खचा डोंगर  कोसाळला आहे.

खासदार अनिल शिरोळे

कोट्यवधी भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणारा लोकमान्य नेता, अमोघ वक्तृत्व असलेला सरस्वतीचा पुत्र, राष्ट्रवादावर अटल निष्ठा असलेला प्रखर देशभक्त, सौजन्याचे आणि शालिनतेचे मूर्तीमंत उदाहरण, कर्तृत्वाचा उत्तुंग मानदंड असलेल्या अटलजींना भावपूर्ण आदरांजली. श्रेष्ठ, समर्थ भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणे हीच त्यांना श्रध्दांजली आहे. , अशा शब्दात पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली आहे.

देशाच्या राजकारण एक मितभाषी आणि कणखर नेतृत्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांना ओळखलं जातं. कारगिलची लढाई असो की भारताला अणुअस्त्रधारी देश बनवण्याच्या निर्णय, त्यांनी आंतरराष्ट्रीय विरोध झुगारत देशहिताचे असंख्य निर्णय घेतले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.