Talegaon Dabhade: नवीन समर्थ विद्यालय व ‌अ‍ॅड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरात जोडून टेक्निकल सायन्स कॉलेज सुरु

Attached Technical science college started in Navin Samarth Vidyalaya & Adv. P. V. Paranjape Vidya Mandir

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालय तसेच अ‍ॅड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर या माध्यमिक शाळांना जोडून यावर्षी पासून इयत्ता 11 वी शास्त्र शाखा संस्थेने सुरु केलेल्या आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे व संस्था चिटणीस संतोष खांडगे यांनी दिली.

पुणे व मुंबईच्या मध्यभागी सर्व दळणवळणांच्या सोईंनी युक्‍त तळेगाव शहर, राहण्याची सुयोग्य व्यवस्था, हवामान, मुबलक पाणी, राज्य व राष्टीय महामार्ग, रेल्वे सुविधा या सर्वामुळे चाकण, भोसरी, तळेगाव एमआयडीसी व पुणे, मुंबई येथे रोजचे रोज जा-ये करून काम करणारा कामगारवर्ग हा
मोठया प्रमाणात तळेगाव शहराला राहण्यासाठी पसंती देतो, त्यामुळे अर्थातच येथील लोकसंख्या मोठया प्रमाणात वाढलेली आहे. वाढत्या  लोकसंख्येबरोबर वाढत्या शैक्षणिक गरजा पुरविण्याचा हा प्रयत्न असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

आज तळेगावमध्ये प्राथमिक ते इंजिनियरिंग तसेच मेडिकलचे शिक्षण मिळत आहे. चांगल्या प्रकारचे करिअर करायचे असेल तर शास्त्र शाखेला प्राधान्य द्यावे लागते. तळेगावमध्ये महाविद्यालयीन शिक्षणाची सोय असली तरी विद्यार्थीसंख्येच्या मानाने ती अपुरी पडत आहे. पुण्यासारख्या ठिकाणी रोज जा-ये करुन शिक्षण घेण्याची परिस्थिती राहिलेली नाही. या बाबी विचारात घेऊन टेक्निकल विषयांसह शास्त्र शाखा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे चिटणीस संतोष खांडगे यांनी दिली.

अ‍ॅड. पु. वा. परांजपे या तळेगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शाळेमध्ये तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व गुरूवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक नवीन समर्थ विद्यालय याला जोडून या वर्षीपासून इ 11 वी सायन्स बरोबर, आयटी, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्टॉनिक्स व मेकॅनिकल हे तांत्रिक विषय शिकविण्यात येणार आहेत. त्याच बरोबर सीईटी, जेईई, नीट, व नाटा या पात्रता प्रवेश परीक्षांची तयारी करुन घेण्यात येणार आहे. संस्थेने डॉ. जयश्री सुरवसे (पीएचडी) यांची विभागप्रमुख म्हणून नेमणूक केली आहे, असे संतोष खांडगे यांनी सांगितले.

विद्यार्थी व पालकांनी त्वरित प्रवेशासाठी तसेच अधिक माहितीसाठी 7031920920 किंवा 9997589386 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.