Hinjawadi News :  दारूभट्टी वर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला

एमपीसी न्यूज – मुळशी तालुक्यातील नेरे येथे सुरु असलेल्या दारूभट्टीवर छापा मारण्यासाठी गेलेल्या हिंजवडी पोलिसांवर काही महिलांनी दगडफेक केली. त्यानंतर हल्ला करणाऱ्या महिला आणि दारूभट्टी चालवणारे व्यक्ती पळून गेले. ही घटना मंगळवारी (दि. 11) दुपारी घडली.

अविनाश बरमा मारवाडी, आदित्य मारवाडी आणि तीन महिला (सर्व रा. शिवाजी कॉलनी रोड, नेरे, ता. मुळशी, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी रवि प्रकाश पवार यांनी मंगळवारी (दि. 11) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना नेरे येथील दारू भट्टीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी (दि. 11) दुपारी चार वाजताच्या सुमारास दारुभट्टीवर छापा घातला. दारूभट्टीतील रसायन पोलीस नष्ट करीत असताना तिथे आलेल्या आरोपींनी पोलिसांना विरोध करण्यासाठी त्यांच्यावर दगडफेक केली. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी झाडीमध्ये पळून गेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.