IPL 2021: आक्रमक कोहलीवर सुपर कुल माही पडला भारी, चेन्नई पुन्हा एकदा ठरले ‘सुपर किंग’!

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) चेन्नई सुपर किंग्जच्या अनुभवी फलंदाजीने कोहलीच्या आरसीबी संघाला 6 गडी आणि जवळपास दोन षटके राखुन विजय मिळवून देत स्पर्धेतला सातवा विजय मिळवत पहिले स्थान पटकावून चेन्नईच सुपर किंग्ज असल्याचे सिद्ध केले.

शारजा मैदानावर झालेल्या आयपीएल 2021 च्या आजच्या 35 व्या सामन्यात आरसीबी संघाने जणू काल मुंबई इंडियन्सने केलेल्या कामगिरीची पुनरावृत्तीच केली, अगदी सेम 2 सेम. उत्तम शतकी सलामी भागीदारीनंतर पडलेल्या विकेट्स आणि मग दडपणाखाली आलेल्या फलंदाजीवर चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजीने लावलेला अंकुश,परीणाम? बिनबाद 111 ते 20 व्या षटकाअखेर 6 गडी बाद 156 धावा.

आज धोनीने कोहली विरुद्ध टॉस जिंकून लगेचच गोलंदाजी घेतली खरी पण कर्णधार कोहली आणि देवदत्त पडिकलने अतिशय जोरदार फलंदाजी सुरु करून उत्तम भागीदारी रचत एका मोठ्या धावसंख्येचा पायाही रचला ,पण  ब्रावो ने भरात खेळत असलेल्या कोहलीची शिकार केली आणि तिथेच कोहलीच्या विराट स्वप्नांचा भंग झाला.

कोहलीने आज अर्धशतकी खेळी करतानाच तो भरात येतोय अशी आशा सुद्धा दाखवली आहे, त्याच जोरावर आज आरसीबीने शतकी सलामी भागीदारी नोंदवली सुद्धा,त्यानंतर देवदत्त पडीकल आणि ए बी डीने 140 पर्यन्त दुसरी विकेट पडू दिली नसली तरी यादरम्यान त्यांना हव्या त्या वेगाने धावा जमवता आल्या नाही, याचे दडपण येताच शार्दूल ठाकूरने एकाच षटकात एबी आणि देवदत्त पडीकलची विकेट मिळवून आरसीबी संघाला पिछाडीवर ढकलले.

ज्यातून मॅक्सवेल आणि इतर फलंदाज सावरलेच नाहीत, याचाच अचूक फायदा उचलत ब्रावो द चॅम्पियनने शेवटच्या षटकात उत्तम गोलंदाजी करत आणखी दोन बळी आपल्या नावावर जमा करत सामन्यात आपल्या चार षटकात केवळ 24 धावात तीन महत्वपूर्ण बळी मिळवले, त्याला शार्दुल ठाकूरने सुद्धा दोन तर दीपक चहरने एक बळी घेत उत्तम साथ दिली. आरसीबी कडून देवदत्त पडीकलने 50 चेंडूत 70, तर कोहलीने 41 चेंडुत 53 धावा जोडल्या, मात्र या दोघांच्या उत्तम खेळानंतर सुद्धा चेन्नई किंग्जच्या सुपर गोलंदाजीमुळे बिनबाद 111 ते सहा बाद 156 अशी अवस्था झाली.

20 षटकात 157 धावांचे लक्ष घेऊन खेळणाऱ्या चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीने सुद्धा आरसीबीच्या सलामी जोडीच्या तोडीस तोड सुरुवात करून देताना आक्रमक फलंदाजी करत षटकामागे 9धावांची सरासरीपेक्षा जास्त वेगाने खेळत पाचव्या षटकाच्या आसपासच अर्धशतकी भागीदारी नोंदवली.

दोघेही सलामीवीर चांगले खेळत होते, तरीही फाफ डुप्लेसीने जरा जास्तच आक्रमक अंदाजात फलंदाजी चालू ठेवली.गायकवाड सुद्धा चांगलेच खेळत होता, पण चहलच्या गोलंदाजीवर कप्तान कोहलीने एक अप्रतिम झेल घेत ऋतुराजची 38 धावांची खेळी संपवत आपल्या संघाला पहिले यश मिळवून दिले. आणि त्याच्या पाठोपाठ फाफ डुप्लेसी सुद्धा मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर सैनीच्या अप्रतिम झेलामुळे तंबूत परतला. त्याने 26 चेंडूत 31 धावा करतांना दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले.

लागोपाठ दोन बळी गेल्यामुळे आणि ड्यु फॅक्टर सुरू झाल्याने चेन्नई संघाची सुद्धा आरसीबी सारखी घसरगुंडी होईल आणि आपल्या संघाला विजय मिळेल अशी आशा कोहली आणि आरसीबीला होती, पण मोईल अली आणि अंबाती रायडूच्या मनात कसलीही भीती वा दडपण नव्हते.

 दोघांनीही तडाखेबंद फलंदाजी करत 48 धावांची वेगवान भागीदारी केल्यानंतर सर्वाधिक बळी मिळवून या स्पर्धेतला आतापर्यंतचा पर्पल कॅपचा मानकरी असलेल्या हर्षल पटेलने मोईन अलीला कोहली द्वारे झेलबाद करून आपली यास्पर्धेतली  बळींची संख्या 18 करत या या सामन्यातली पहिली विकेट घेतली. आणि त्यानेच अंबाती रायडूला वापस पाठवत सामन्यात रंगत निर्माण केली खरी पण तोवर विजय चेन्नई संघाच्या दृष्टीक्षेपात आलेला होताच.

अनुभवी सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शांत डोके ठेवत अधिक पडझड होऊ दिली नाही आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. रैनाने केवळ दहा चेंडूतच नाबाद 17 धावा करताना दोन चौकार आणि एक षटकार मारला तर धोनीने नाबाद 11 धावा करत त्याला चांगली साथ दिली. दबावाखाली उत्तम गोलंदाजी करणारा ब्रावो सामनावीर ठरला.

सुरुवातीला नंबर 1 वर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यानंतर मात्र लागोपाठच्या पराभवामुळे अचानक मागे पडले आहे. हीच 20/20 या खेळाची गंम्मत आहे. अर्थात आरसीबीसाठी आजच्या पराभवात सुद्धा कोहलीच्या आजच्या फलंदाजीमुळे आशा फुलली असेल, त्याचे फॉर्म मध्ये येणे आरसीबी साठी आणि अर्थातच येत्या 20/20 विश्वकरंडकासाठी भारतीय क्रिकेटसाठी फार मोठी आनंदी बाब आहे, नाही का?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.