Lonavla News : लोणावळा परिसरातील बंद बंगले फोडून चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, 1 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज : लोणावळा परिसरातील बंद बंगले फोडून चोरी करणारा एक अट्टल चोरटा लोणावळा शहर पोलिसांच्या सापळ्यात सापडला आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. वसिम सल्लाउद्दिन चौधरी (रा. वाकसईचाळ, लोणावळा) असे या चोरट्याचे नाव आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना खबर्‍याकडून माहिती समजली की, बंद बंगले फोडून चोरी करणारा एक अट्टल चोरटा लोणावळा बाजारपेठेत चोरीचे मोबाईल व अन्य साहित्य विक्रीसाठी आला आहे. या माहितीच्या आधारे निरीक्षक पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक नितिन सुर्यवंशी, पोलीस काॅन्स्टेबल अजिज मेस्त्री, राहुल खैरे, मनोज मोरे यांना साध्या वेशात वसिम यांच्या मागावर पाठविले.

त्यावेळी वसिम चौधरी हा त्याने चोरी केलेले मोबाईल घेवून लोणावळा बाजारपेठ परिसरात खरेदीकरीता येणार्‍या जाणार्‍यांना आपको सेकंड हॅन्ड मोबाईल खरीदना है क्या? मेरे पास मोबाईल है’ असे सांगत असल्याचे मिळून आला.

त्याच्यावर वाॅच ठेवत गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी बाजारपेठतून शिताफीने वसिमला ताब्यात घेवून पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने मागील 15 दिवसात रात्रीचे वेळेस गोल्ड व्हॅली सेक्टर सी तुंगाली लोणावळा मधील एका टिटॉस नावाच्या बंगल्यामध्ये घरफोडी करून दोन सोन्याचे अंगठया व दोन मोबाईल फोन चोरी केल्याची कबूली दिली.

तसेच सदर घरफोडी करण्यासाठी त्याने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हददीतील वरसोली गाव येथून एक मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. सदरचा सराईत चोरटा वसिम सल्लाउददीन चौधरी याचेकडून घरफोडी मधील एकूण दोन सोन्याचे अंगठया व दोन मोबाईल तसेच एक मोटार सायकल असा एकुण 1 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वसिम याच्यावर यापुर्वी देखील चोरी व घरफोडीचे काही गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून चोरीचे आजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.