Talegaon News : सोमाटणे गावात एटीएम फोडण्याचा प्रयत्न; अज्ञात चोरट्यासह एटीएम सुरक्षा एजन्सीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सोमाटणे गावात शिरगाव रोडवर अज्ञात चोरट्याने महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम मधून रोकड चोरीला गेली नाही. ही घटना शनिवारी (दि. 18) मध्यरात्री सव्वाबारा ते सकाळी पावणे नऊ वाजताच्या कालावधीत घडली.

याप्रकरणी अज्ञात चोरट्यासह एटीएम सुरक्षेची जबाबदारी घेतलेल्या एजन्सी विरोधात देखील भारतीय दंड विधान कलम 380, 511, 461, 109, 188, सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68, 140 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक मिलिंद शिंदे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे गावात शिरगाव रस्त्यावर महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. त्या एटीएम मध्ये सुरक्षा रक्षक नाही. सुरक्षा रक्षक नसल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्याने शनिवारी मध्यरात्री एटीएम सेंटर मध्ये प्रवेश केला. मशीनचे समोरील लोखंडी झाकण उचकटून उघडले. त्यानंतर खालील बाजूचे लॉक तोडले. रोख रक्कम बाहेर येण्यासाठीचे रोलर अर्धवट तोडून ते उचकटले. चोरट्याने मशीन मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला पैसे काढता आले नाहीत.

एटीएम सेंटरच्या सुरक्षेसाठी चोवीस तास हत्यारधारी सुरक्षा रक्षक नेमणे, अलार्म सिस्टीम बसवणे आवश्यक असताना बँकेने अथवा संबंधित सुरक्षा एजन्सीने खबरदारी घेतली नाही. पोलिसांनी याबाबत बँकेला लेखी व तोंडी वारंवार सूचना दिल्या आहेत.

मात्र बँकेने व संबंधित एजन्सीने पोलिसांच्या सूचनांना थेट केराची टोपली दाखवली. सुरक्षा एजन्सीचा  निष्काळजीपणा चोरट्यास अप्रत्यक्ष चोरी करण्यास सहाय्य करणारा ठरला असल्याने संबंधित एजन्सी विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.