Chikhali Crime News : मायलेकाचा सावत्र मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न  

एमपीसी न्यूज – कबुतर उडवल्याच्या कारणावरून माय लेकाने सावत्र मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बोल्हाईमळा, जाधववाडी, चिखली येथे गुरुवारी (दि.4) साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आईसह मुलगा व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी हल्ला झालेला सागर दयानंद कांबळे ( वय 28, रा. बोल्हाईमळा, जाधववाडी, चिखली ) याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी ची सावत्र आई माया कांबळे, सावत्र भाऊ सिद्धेश्वर कांबळे (रा. बोल्हाईमळा, जाधववाडी, चिखली ) यांच्या सह इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ श्रीधर याने कबुतर उडवल्याच्या कारणावरून आरोपींनी त्याला शिवीगाळ करत ‘तू बाहेर ये तुला खूप मस्ती आली आहे’ अशी धमकी दिली. त्यावेळी आरोपी माया कांबळे हिने फिर्यादी सागर कांबळे यास घट्ट पकडले व ‘याला सोडू नको, मार’ असे म्हणाली.

त्यानंतर आरोपी सिद्धेश्वर कांबळे याने कु-हाडीने सागर कांबळे यांच्या डोक्यात, हातावर, पायावर व पाठीवर वार केले. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या इतर चार ते पाच जणांनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. पी. देशमुख करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.