Chinchwad : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने सोशल मिडीयावर बनावट अकाउंट सुरु करून पैसे उकळण्याचा प्रयत्न
फसव्या लोकांच्या बळी न पडण्याचे आयुक्तांचे आवाहन
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने सोशल मिडीयावर बनावट अकाउंट तयार करून त्याद्वारे काही लोकांकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नागरिकांनी फसव्या लोकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाचा वापर करून अज्ञातांनी सोशल मिडीयावर ‘Krishna Mumbai’ या नावाने बनावट अकाउंट तयार केले. त्या अकाउंटवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे फोटो देखील लावण्यात आले.
त्यानंतर सोशल मिडियावरील त्या फेक अकाउंटद्वारे काही लोकांशी अज्ञातांनी मेसेजद्वारे संपर्क केला. त्यामध्ये आरोपीने एकाला मदत मागितली. तसेच ‘पेटीएम वापरता का’ असे देखील विचारले. त्याद्वारे काही रक्कम पाठवण्याची विनंती करत 10 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. त्यामध्ये अज्ञात व्यक्तीने 7027798520 या क्रमांकावर पैसे पाठवण्यास सांगितले आहे.
याबाबत आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. ‘माझ्या नावाने अज्ञातांनी सोशल मिडीयावर काही अकाउंट सुरू केली आहेत. त्याद्वारे संपर्क करून पैशांची मागणी केली जात आहे.’ असे आयुक्तांनी म्हटले आहे.
हा प्रकार गंभीर आहे. यावरून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी याला बळी पडू नये, असेही आयुक्त कृष्ण प्रकार म्हणाले.
थेट पोलीस आयुक्तांच्या नावाने असे प्रकार सुरु असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अशा लोकांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.