Nigdi News : निगडित भंगार व्यावसायिकाला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – मित्रांसोबत थांबलेल्या एका भंगार व्यावसायिकाला त्याच्या भावासोबत झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दोन पिस्तूलमधून भंगार व्यावसायिक आणि त्याच्या मित्राच्या दिशेले दोन गोळ्या झाडल्या. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री पावणे बारा वाजता सेक्टरक्रमांक 22, निगडी येथील बिल्डिंग क्रमांक सातच्या समोर घडली.

प्रशांत रमेश कोळी (वय 32), सुरज पवार (वय 28), राहुल सोनकांबळे (वय 28, तिघे रा. सेक्टर क्रमांक 22, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत भरत ज्ञानोबा थोरात (वय 28, रा सेक्टर क्रमांक 22, आझाद चौक, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत हे भंगारचा व्यवसाय करतात. त्यांच्या भावासोबत आरोपींचे शिवीगाळ करण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. त्या कारणावरून आरोपी एका स्विफ्ट कार (एम एच 14 / 4034) मधून आले. त्यावेळी फिर्यादी बिल्डिंग क्रमांक सातच्या समोर त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते.

आरोपी तिथे आले आणि फिर्यादी व त्यांचा मित्र रफिक यांना म्हणाले ‘तुम्हाला ठोकतो. गोळ्या घालतो’. त्यानंतर आरोपी प्रशांत कोळी आणि सुरज पवार यांनी त्यांच्या हातातील पिस्तुलातून फिर्यादी आणि त्यांचा मित्र रफिक यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या.

आरोपींनी गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली. त्यांच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांनी आपापल्या घराच्या खिडक्या, दरवाजे बंद करून घेतले असल्याचे भरत थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, सहाय्यक निरीक्षक व्ही एम धुमाळ, एल एन सोनवणे या अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली.

सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे म्हणाले, “घटना घडल्यानंतर तात्काळ आरोपींच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास सुरु आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.