Crime News : धावत्या रेल्वेतून 8 वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्काराचा प्रयत्न, विरोध केल्याने खाली फेकले

एमपीसी न्यूज : गोवा येथून दिल्लीच्या दिशेने कुटुंबासोबत निघालेल्या 8 वर्षीय मुलीचे धावत्या रेल्वेतून झोपेत असताना अपहरण करून तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकाराला विरोध केल्यामुळे या आठ वर्षीय चिमुरडीला धावत्या रेल्वेतून खाली फेकण्यात आले.

हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मिरज रेल्वे विभागात हा प्रकार घडला आहे. प्रभू मलाप्पा उपहार (वय 33) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भारतीय सैन्य दलात तो नाईक पदावर कार्यरत आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की पीडित मुलीचे वडील लष्करात अधिकारी होते. काही दिवसांपूर्वीच ते रिटायर झाले आहेत. मूळचे दिल्लीचे असणारे हे कुटुंब गोव्यावरून दिल्लीच्या दिशेने रेल्वेने निघाले होते. प्रवासादरम्यान आठ वर्षाची चिमुरडी झोपेत असताना एका व्यक्तीने तिला उचलून रेल्वेच्या बाथरूम मध्ये नेले. या ठिकाणी तिचे कपडे काढण्याच्या प्रयत्नात असतानाच तिला जाग आली. या सर्व प्रकाराला विरोध करत तिने आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपीने तिला धावत्या रेल्वेतून खाली फेकून दिले.

दरम्यान लोहमार्ग पोलिसांना लोणंद ते सालपा रेल्वे दरम्यान ती मुलगी सापडली होती. पोलिसांनी या मुलीला सातारा येथील एका रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर या मुलीचे शुद्ध परत आली आणि तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी मी तातडीने गुन्हा दाखल करीत तपासाला सुरुवात केली आणि भुसावळ रेल्वे स्थानका दरम्यान या मुलीने सांगितलेल्या वर्णनानुसार चार व्यक्तींना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान प्रभू मलाप्पा उपहार त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मौला सय्यद व त्यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.