Nigdi News : पुरातन काळातील नाणे कोट्यवधींना विकण्याचा प्रयत्न; नऊ जणांना अटक

एमपीसी न्यूज – पुरातन काळातील धातूचे नाणे एका होमगार्डला विकून त्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नऊ जणांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 16 लाख 69 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 10) दुपारी खंडोबामाळ, आकुर्डी येथे करण्यात आली.

हरीश परशुराम पाटील (वय 68, रा. औरंगाबाद), संजय अर्जुन कुचेकर (वय 42, रा. खराडी, पुणे), सुजित राजेंद्र  सारफळे (वय 21, रा. उस्मानाबाद), प्रमोद रामचंद्र बचाटे (वय 40, रा. उस्मानाबाद), राजेश विजयकुमार गोवर्धन (वय 41, रा. उस्मानाबाद), रत्नाकर विजय सावंत, किशोर ज्ञानेश्वर भगत (वय 36, दोघे रा. गोपाळनगर, डोंबिवली पूर्व), इमरान हसन खान (वय 43, रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक कंठय्या गुरय्या स्वामी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून होमगार्ड वैभव तावरे यांना पुरातन काळातील धातूचे नाणे लिबो कॉईन ज्यामध्ये हाय इरिडियम नावाचे केमिकल आहे. त्यामुळे त्याला मार्केटमध्ये दहा कोटी रुपयांची किंमत आहे, असे भासवून फसवणुकीच्या हेतूने होमगार्ड वैभव तावरे यांना विकण्याचा प्रयत्न केला.

याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात लाख रुपयांची रोख रक्कम, पुरातन काळातील एक नाणे, एक लाख 19 हजार 500 रुपये किमतीचे नऊ मोबाईल फोन, आठ लाख 50 हजार रुपये किमतीच्या दोन कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.