IPL 2021 Auction : 2021 आयपीएलची लिलाव प्रक्रिया 18 फेब्रुवारीला

292 खेळाडू मैदानात

एमपीसी न्यूज – 2021 आयपीएल हंगामाची लिलाव प्रक्रिया 18 फेब्रुवारीला पार पडणार आहे. यावेळी लिलावाच्या मैदानात 292 खेळाडू आहेत. देशा विदेशातील अनेक खेळाडूंनी लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानंतर 292 खेळांडूंची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडूलकर याचा चिंरजीव अर्जून तेंडूलकर याचा देखील या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे.

लिलाव सोहळा चेन्नईमध्ये पार पडणार असून, दुपारी 3 वाजता लिलाव प्रक्रियेला सुरूवात होईल. लिलावासाठी एकूण 164 भारतीय, 125 परदेशी आणि आयसीसी सोबत संलग्न असलेल्या देशाचे 3 असे एकूण 292 खेळाडू उपलब्ध असणार आहेत. यावेळी एक हजार 114 खेळाडूंनी लिलाव प्रक्रियेसाठी नोंदणी केली होती. लिलावासाठी पंजाबसंघाकडे सर्वाधिक 53.2 कोटी रूपये शिल्लक आहेत. तसेच, राजस्थान रॉयल्सकडे 37.85 कोटी, बंगळूरू संघाकडे 35.4 कोटी रूपये शिल्लक आहेत.

खेळाडूंच्या मूळ किंमतीनुसार त्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. सर्वाधिक 2 कोटी इतकी मूळ किंमत असणाऱ्यांमध्ये हरभजन सिंग, केदार जाधव, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, शाकीब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियम प्लंकेट, जेसन रॉय, मार्क वूड या खेळाडूंचा समावेश आहे.

दीड कोटी मूळ किंमत असणारे 12 तर 1 कोटी मूळ किंमत असणारे 11 खेळाडू आहेत. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनी या लिलावातून माघार घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.