Aundh: अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त डॉ.आंबेडकर महाविद्यालयात व्याख्यान व कवी संमेलन

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

0

एमपीसी न्यूज – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील मराठी विभागाने झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने  व्याख्यान व कवी संमेलनाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक आणि वाड्मयीन कार्यावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कार्य करताना ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली’ या लावणीच्या माध्यमातून मातृभूमीविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे.

कामगार जीवनाचे वास्तव चित्रण करताना ते म्हणतात की ‘ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, ती श्रमिक, कष्टकरी व दलितांच्या तळहातावर तरलेली आहे’. अशा स्वरूपाचे सामाजिक वास्तव त्यांनी आपल्या साहित्यामधून मांडले आहे.  अण्णाभाऊ साठे यांनी लावणी, पोवाडे, कथा आणि कादंबरी लेखन करून साहित्याची सेवा केली. कोरोना या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आहे. असे मत प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब यांनी व्यक्त केले

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सुदेश भालेराव यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून दिला. अण्णाभाऊ साठे यांनी दीर्घकाळ समाजाची आणि साहित्याची सेवा केली. त्यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जोपासत साहित्य लेखन केले. अण्णाभाऊ साम्यवादी विचाराचे अर्थतज्ञ होते. त्यामुळे त्यांनी कामगार वर्गाचे आर्थिक गणित मांडले. त्यांनी आपल्या कथा-कादंबरी लेखनामधून स्त्रियांच्या वास्तव जीवनाचे दर्शन घडवत स्री सुधारणेचा विचार व्यक्त केला आहे.

अण्णाभाऊ साठे कुशल संघटक आणि कामगार नेते होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले. तसेच तमाशा (लोकनाट्य) या लोककलेला जिवंत ठेवणारे एक कलावंत होते. वाटेगाव ते मुंबई आणि मुंबई ते रशिया असा प्रवास करून, जागतिक पटलावर त्यांनी स्वतःचे नाव कोरले. अण्णाभाऊंचे व्यक्तिमत्व खिलाडू वृत्तीचे होते. त्यांना विविध प्रकारचे खेळ येत होते. अशाप्रकारे सुदेश भालेराव यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून दिला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी स्वलिखित कविता सादर केल्या. यामध्ये  चंद्रकांत सोनवणे-‘आई’, अरुण साबळे -‘हे कोरोना’, तेजस राजिवडे-‘आयुष्य’, परमेश्वर रिठे – ‘आठवण येते तेव्हा’, प्रज्ञा शिंदे-‘रक्षाबंधन’, गोविंद गायकवाड-‘शेवटी माणूस माणसासारखाच वागला’, विशाखा भगत-‘शिक्षण’, आकाश टेंभुर्णीकर-‘प्रेम कविता’, मोहिनी खवळे- ‘रयतेचा राजा’ इतर विद्यार्थ्यांनी आपल्या स्वलिखित कविता सादर केल्या. तसेच प्रा.नलिनी पाचर्णे यांनी ‘झाड’ तर डॉ.संजय नगरकर यांनी ‘हिरवा निसर्ग’ ही कविता सादर केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख मराठी विभागप्रमुख डॉ.संजय नगरकर यांनी तर कार्यक्रमाचे आभार डॉ.अतुल चौरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय सेवक वर्ग ऑनलाईन पद्धतीने  उपस्थित होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like