Aundh : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा           

एमपीसी न्यूज – औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

औंध येथील ड. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व्याख्यान,  काव्यवाचन स्पर्धा,  सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,  निबंध लेखन स्पर्धा,  वक्तृत्व स्पर्धा,  मराठी नाट्य प्रयोगाचे दर्शन,  लेखन विषयक कार्यशाळा आणि मला आवडलेल्या पुस्तकावरील मनोगत अशा बहुरंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.विलास सदाफळ, हर्षकुमार घळके आदी उपस्थित होते.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयात ‘मला आवडलेल्या पुस्तकावरील मनोगत’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कु. मोनाली भालवणकर हिने बाबूराव बागूल यांच्या कादंबरीवर मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत सोनवणे याने  प्रकाश आमटे यांच्या रानवाटा या  पुस्तकावर  मनोगत व्यक्त केले. सुदेश भालेराव याने दया पवार यांच्या बलुतं या आत्मकथनावर आपले मनोगत व्यक्त केले.  राहुल शेळके याने एका कोळियाने या पुस्तकावर मनोगत व्यक्त केले. रोहित पोटे याने अण्णाभाऊ साठे यांच्या वारणेचा वाघ या कादंबरीवर आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय नगरकर म्हणाले की. मस्तक  घडविण्याचे कार्य पुस्तके करतात. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा. तसेच विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होऊन त्यांनी साहित्य निर्मिती करावी. अशा हेतूने हा उपक्रम घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाबरोबर समाज आणि माणूस वाचावा असे आवाहन या निमित्ताने त्यांनी केले.

महाविद्यालयाच्या  प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या की,  चांगले आयुष्य कसे जगायचे हे पुस्तकांमुळे समजते. त्यमुळे जो विद्यार्थी अधिकाधिक पुस्तके वाचतो. तो अधिकाधिक समृद्ध आणि ज्ञानी होतो. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाशी मैत्री करूण अधिकाधिक पुस्तके वाचावीत असे आवाहन केले. इंग्रजी विभागप्रमुख  डॉ. सविता पाटील म्हणाल्या की,  विद्यार्थ्यांनी वाचन करता करता मनन आणि चिंतनाच्या माध्यमातून क्रिएटिव्ह रायटींग  करायला सुरुवात करावी. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा शिंदे हिने तर आभार डॉ.अतुल चौरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.