-MPC-TOP-MOST-BANNER-I

Aundh News : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टाईला ‘यश’; स्पायसर शाळेकडून फीमध्ये सवलतीची घोषणा

नर्सरी ते यूकेजीच्या शुल्कात 50 टक्के, पहिले ते बारावीसाठी 25 टक्के सवलत

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : शैक्षणिक शुल्क माफीसाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या पालकांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने थेट औंध येथील स्पायसर शाळेत धाव घेतली. शुल्क माफीबाबत पालकांचे म्हणणे एकूण घेत मुख्याध्यापक आणि संस्थाप्रमुखांसोबत चर्चा केली. या नंतर शाळा व्यवस्थापनाने नर्सरी ते यूकेजीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात 50 टक्के, तर पहिले ते बारावीच्या विद्यार्थ्यांना 25 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला.

याबाबत मुख्याध्यापक शशिकांत गायकवाड यांनी यश साने यांना या निर्णयाचे लेखी पत्र पाठविले आहे. औंध येथील स्पायसर शाळेत पालकांनी विद्यार्थ्यांचे गेल्या वर्षीचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ( दि. 21) सकाळी आंदोलन सुरु केले. याबाबत पालकांकडून माहिती मिळताच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष यश साने यांनी तात्काळ स्पायसर शाळेत धाव घेतली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सुरज निंबाळकर, सौरभ शेळके, ऋषिकेश तापकीर आदी उपस्थित होते.

साने यांनी आंदोलक पालक यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्या तक्रारी आणि मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर साने यांनी मुख्याध्यापक शशिकांत गायकवाड आणि संस्था अध्यक्ष यांच्यासोबत पालकांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.

कोरोना महामारी आणि त्यानंतर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे. काहींचे रोजगार गेले असल्याची वस्तुस्थिती साने यांनी शाळा व्यवस्थापनसमोर मांडली. अशा कठीण प्रसंगी पालकांना दिलासादायक निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

त्यानुसार शाळा व्यवस्थापनाने नर्सरी ते यूकेजीच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के, तर पहिले ते बारावीच्या विद्यार्थ्यांना 25 टक्के शैक्षणिक शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनामुळे मृत्यू झाले, त्यांनी त्याबाबत मृत्यू दाखला सादर केल्यास त्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक शुल्कात शंभर टक्के सवलत दिली जाईल, असे जाहीर केले.

त्याचबरोबर 2020-2021 या शैक्षणिक वर्षातील सर्व रिपोर्ट कार्ड विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले असून, चालू 2021-22 या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम 1 जुलैपासून सुरु करणार असल्याचे शाळा व्यवस्थापनाने लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn