Aurangabad: मोठी बातमी! लोहमार्गावर झोपलेले 16 मजूर रेल्वेगाडीखाली सापडून मृत्युमुखी, एकजण गंभीर जखमी

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हतबल होऊन घरी निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला

एमपीसी न्यूज – कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हतबल होऊन घरी निघालेल्या मजुरांवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. औरंगाबाद-जालना दरम्यान करमाड येथे लोहमार्गवर झोपलेले मध्यप्रदेशातील 16 मजूर मालगाडीखाली सापडून जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाले. चार मजूर बाजूला झोपले असल्याने सुदैवाने बचावले आहेत. आज (शुक्रवारी) पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हे सर्व 21 मजूर एका खासगी कंपनीत कामाला होते. कंपनीच्या मालकाला न सांगताच मध्यप्रदेशातील त्यांच्या गावी ते पायी निघाले होते. लोहमार्गावरून ते भुसावळच्या दिशेने निघाले होते. चालून दमल्याने ते लोहमार्गावर बसले आणि रेल्वेगाड्या बंद असल्याचे समजून लोहमार्गावरच झोपी गेले. मात्र झोपेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

जालनाकडून औरंगाबादला जाणाऱ्या मालगाडीखाली सापडून 16 मजूर जागीच ठार झाले. एक मजूर गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार मजूर लोहमार्गाच्या बाजूला झोपले असल्यामुळे त्यांच्या सुदैवाने बचावले. दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे हे मजूर मिळेल त्या रस्त्याने घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल हे सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणात केंद्राकडून लागेल ती मदत दिली जाईल, असेही मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.