T20 WC : ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर पाच गडी राखून विजय मिळवून केली आपली जोरदार सुरूवात

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – बहुचर्चित विश्वकरंडक 2021 ला सुरुवात झाली आणि आता मुख्य सामन्याला सुद्धा सुरुवात झाली, आजच्या तेराव्या सामन्यात विजयाची बहुतांश पसंती दिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने त्याला जागत दक्षिण आफ्रिका संघावर पाच गडी राखून मात केली खरी पण त्यासाठी त्यांच्या नाकी नऊ आले होते. पाच गडी बाद झाले आणि अगदी शेवटच्या षटकात कांगारूने विजयाच्या भोज्याला हात लावून विजयी सलामी दिली.

अबूधाबीच्या शेख झाईद मैदानावर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली आणि अरॉन फिंचच्या गोलंदाजानी आपल्या कर्णधाराच्या निर्णयाला सार्थ ठरवले. दक्षिण आफ्रिका संघाला केवळ 119 या धावसंख्येत रोखले. कधी काळी जागतिक क्रिकेटमध्ये एक काळ गाजवलेला आफ्रिका संघ सध्या संक्रमण अवस्थेत आहे त्यांना तसेही आजतागायत एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही.

क्रिकेटविश्वात त्यांना चोकर्स म्हणून हिनवले जाते. आता तर त्यांच्या संघाला पुनर्बांधणी करावी लागत आहे. आजही डीकॉचच्या संघाला नैराश्यच लाभले. अत्यंत खराब सुरुवात झाल्यानंतर मारक्रमच्या 40 धावांमुळे दक्षिण आफ्रिका संघाने कसेबसे 100 धावांच्या पुढे जाता आले.

एक बाद तेरा ते चार बाद 46 अशा कठीण परिस्थितीत असताना मारक्रम आणि रबाडाच्या उपयुक्त फलंदाजीने संघाला 119 ही बऱ्यापैकी लढाई साठी उपयुक्त धावसंख्या गाठून दिली.ऑस्ट्रेलिया कडून झंपा,हेजलवूड आणि स्टार्कने प्रत्येकी दोन बळी घेत आफ्रिका संघाला रोखून धरले. मारक्रमने सर्वाधिक 40 धावा काढल्या तर रबाडाने 19,मिलरने 16 धावा काढून त्याला बऱ्यापैकी साथ दिली.

120 धावांचे लक्ष ऑस्ट्रेलिया संघासाठी तसे कठिण नव्हते खरे, पण कर्णधार फिंच आणि खराब फॉर्म मधून जात असणाऱ्या डेव्हिड वॉर्नर हे संघाला फारशी चांगली सुरुवात करून देण्यात आजही यशस्वी ठरले नाहीत. फिंच तर भोपळाही फोडू शकला नाही. वॉर्नर केवळ14 च धावा करू शकला, तर मिशेल मार्श सुद्धा 11 धावा काढून बाद झाला.

यावेळी कांगारूची अवस्था आठ षटकात तीन गडी बाद 38 अशी बिकट झालेली होती,पण स्टिव्ह स्मिथ आणि मॅक्सवेल या अनुभवी द्वयीने संघाला सावरत 42 धावांची उपयुक्त भागीदारी रचली, पण हे दोघेही लागोपाठ बाद झाले. षटकामागे सहाहून अधिक धावांची गरज असल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली खरी पण मार्क्स स्टोयनिसने शांतचित्ताने खेळत संघाला मॅथ्यू वेडच्या साथीने शेवटच्या षटकात रोमहर्षक विजय मिळवून देत आपल्या संघाला दोन महत्वपूर्ण अंक ही प्राप्त करून दिले.

स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक 35 रन्स केले तर स्टोयनिसने महत्वपूर्ण नाबाद 24 धावा केल्या.साऊथ आफ्रिकेकडून नोर्जेने दोन गडी तर शम्सी,रबाडा आणि केशव महाराज यांनी एकेक गडी बाद करून कांगारूला विजयासाठी बऱ्यापैकी झुंजवले. पण अखेरीस कांगारूने पाच गडी राखुन विजयी सलामी देत आपला आगाज विजयाने केला.यात महत्वाचा वाटा उचलणारा जॉर्ज हेजलवूड विजयाचा आणि सामन्याचा मानकरी ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.