IND vs AUS : जबरदस्त खेळ करत ऑस्ट्रेलियन संघाने भारताला पराभूत करत जिंकली मालिका

एमपीसी न्यूज :  चेन्नईच्या मैदानावर झालेल्या तीन सामन्याच्या मालिकेतल्या या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने जबरदस्त खेळ करत मायदेशात बलाढ्य असणाऱ्या (IND vs AUS) भारतीय संघाला 21 धावांनी पराभूत करत तीन सामन्याची मालिका 2 विरुद्ध एक अशी जिंकून भारताला भारतात मात दिली.

मालीकेचा विजेता ठरवणारा हा सामना असल्याने या सामन्याच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते, या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारतावर वर्चस्व ठेवत पराभूत करून दाखवले. या महत्वपूर्ण सामन्याला चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर सुरुवात झाली, ज्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियन संघाच्या बाजूने लागला आणि स्टिव्ह स्मिथने कसलाही विलंब न करता प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी त्याने अनुभवी डेविड वॉर्नर आणि अष्टन अगरला संघात स्थान दिले, तर भारतीय संघाने आधीच्याच सामन्यातला संघ कायम ठेवला.

हेड आणि मार्श या जोडीने डावाची सुरुवात करताना आक्रमक अंदाजात फलंदाजी सुरु केली,केवळ षटकार आणि चौकाराच्याच भाषेत हे दोघे भारतीय गोलंदाजी फोडून काढत होते, फक्त 10 षटकात या जोडीने 68 धावा चोपत संघाला शानदार सुरुवात करून देत रोहित शर्माची काळजी वाढवली,ही जोडी तापदायक ठरतेय असे वाटत असतानाच हार्दिक पांड्याने आपली कमाल दाखवून कर्णधार रोहितला काही अंशी दिलासा दिला. प्रथम त्याने हेडला कुलदीप यादवच्या हातून झेलबाद केले तर पुढच्या षटकात कर्णधार स्मिथला भोपळा फोडण्याआधीच एका अप्रतिम चेंडूवर चकवत राहुलच्या हातून झेलबाद केले आणि हे कमी की काय असे वाटावे असा चमत्कार करत खतरनाक फलंदाजी करणाऱ्या मार्शचाही खेळ तमाम करत भारतीय संघाला मोठेच यश मिळवून देत ऑस्ट्रेलियन संघाची अवस्था नाबाद 68 वरून तीन बाद  85 अशी केली.

 

क्रिकेटमधील हीच अनिश्चितता क्रिकेटचाहत्यांना प्रचंड आवडते,काही वेळापूर्वीच शानदार अवस्थेत असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला उपकर्णधार पांड्याच्या एका अप्रतिम स्पेलने संकटात आणून टाकले,या कठीण प्रसंगी अनुभवी वॉर्नर आणि लांबूशेन या जोडीने आपल्या अनुभवाच्या जोरावर 40 धावांची (IND vs AUS)  छोटी पण मौल्यवान भागीदारी करत पुन्हा एकदा चांगली आशा दाखवली, हे दोन्हीही फलंदाज किती खतरनाक आहेत याची पूर्ण जाणीव कर्णधार रोहितला असल्याने त्याने आपल्या हुकमी एक्का जडेजा ऐवजी कुलदीपच्या हातात चेंडू देवून आपल्या नेतृत्व कौशल्याची कमाल दाखवली  आणि कुलदीपने सुध्दा आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना  आधी वॉर्नर अन मग थोड्याच वेळात लाबूशेनलाही बाद करत पाहुण्या संघाचा अर्धा डाव 138 धावसंख्येतच तंबूत परत पाठवला.

 

यावेळी भारतीय संघ सामन्यात आघाडीवर आहे असे वाटत होते, मात्र पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन शेपूट वळवळले आणि ते पण असे की अर्धा संघ तंबूत परतल्यावर सुद्धा त्यांनी जवळजवळ तितक्याच आणखी धावा करत संघाला 269 धावांची चांगली आणि सन्मानजनक धावसंख्या गाठून देत ऑस्ट्रेलियन संघ वर्षानुवर्षे एक बलाढ्य आणि प्रथम क्रमांकाचा संघ का आहे हेच सिद्ध करून दाखवले. कॅरी(38),स्टोयनिस (25) आणि अबोट(26) यांनी उपयुक्त फलंदाजी करत संघाला संकटातून बाहेर तर काढलेच पण जवळजवळ एका मजबूत धावसंख्येच्या जोरावर विजयाच्या मार्गावरही आणले. याचवेळी अर्धा संघ तंबूत पाठवल्यानंतरही ऑस्ट्रेलियन तळाच्या फलंदाजांना जास्त संधी दिल्याने भारतीय कर्णधार काहीसा निराश दिसला,भारतीय संघाकडून पांड्या आणि कुलदीप यादव यांनी उत्तम गोलदाजी करत तीन तीन बळी मिळवले तर त्यांना अक्षर आणि सिराजने दोन दोन गडी बाद करत उत्तम साथ  अर्धशतकविना ऑस्ट्रेलियन संघातल्या जवळपास सर्वच फलंदाजांनी आपापल्या भूमिका चोख पार पाडल्यामुळेच ऑस्ट्रेलियन संघ ही चांगली धावसंख्या उभारू शकला.

 

 

Today’s Horoscope 23 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मालिका जिंकण्यासाठी आणि मायदेशातले आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला 300 चेंडूत 270 धावा करायच्या होत्या, चेन्नईच्या दमट हवामानात आणि त्यातही पाठलाग करताना हे लक्ष सोपे तरी मुळीच नव्हते,मात्र ते अगदीच मामुलीही नव्हते, रोहित आणि गील या सलामी जोडीने आधी सावध आणि मग शानदार सुरुवात करताना पहिल्या 46 चेंडूतच 50 धावांची नाबाद सलामी भागीदारी करत चांगली सुरुवात करुन दिली,(IND vs AUS) गीलचा सध्याच्या फॉर्मला कोणाचीही नजर लागू नये कारण तो सध्या जसे खेळतोय ना ते बघून त्याचे  आणि भारतीय संघाचे उज्ज्वल  भवितव्य दिसून येतेच,त्याची आजची सुरुवातही अतिशय शानदार अशीच होती, त्याची ती आत्मविश्वासपूर्ण खेळी बघून आधी सावधगिरी बाळगणारा रोहितपण लयात येतोय असे वाटत असतानाच तो त्याच्या आवडत्या आणि कधी कधी नुकसान करणाऱ्या हुकच्या फटक्याच्या नादात मार्शच्या सुंदर झेलामुळे अबोटच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला,

 

रोहितने केवळ 17 चेंडूतच 2 चौकार आणि तितकेच शतकार मारत  30 धावा केल्या, पण या चांगल्या सुरुवातीला तो मोठया खेळीत बदलू शकला नाही ,तो बाद झाला तेंव्हा भारतीय संघाची धावसंख्या होती 1 बाद 65,ज्या 55 चेंडूत आल्या होत्या,यानंतर खेळायला आला तो कोहली, ज्याला मोठ्या कालावधीनंतर सर्वच फॉरमॅट मध्ये फॉर्म मिळतोय ,आज त्याने त्याच लयीत खेळून संघाला मालिका विजय मिळवून द्यावा अशीच अपेक्षा चेपोकवरील असंख्य रसिकांसह दूरदर्शनच्या माध्यमातून सामना बघणाऱ्या अनगिणत प्रेक्षकांची होती मात्र आपल्याला जे वाटते ते होतेच असे नसते ना,नेमके तेच आजही झाले,शानदार खेळणाऱ्या गीलला ऍडम जांपाने एका अप्रतिम फिरकी चेंडूवर चकवले आणि पायचीत केले,जे अपील मैदानावरील पंचानी फेटाळून लावले खरे,पण डिआरएसला सहा सेकंद बाकी असताना स्मिथने विचारपुर्वक मागितलेले अपील टीव्हीवरील तिसऱ्या पंचांनी मान्य केले आणि असंख्य प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला, गील 49 चेंडूत 37 धावा काढून निराश होत तंबूत परतला.

 

यानंतर रोहितने सूर्यकुमार ऐवजी के एल राहुलला बढती देत फलंदाजीसाठी पाठवले,आणि त्याने तो निर्णय योग्यच ठरवत कोहलीला उत्तम साथ देत 69 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढण्यात चांगलाच वाटा उचलला,ही जोडली टिकली आहे असे वाटत असताना (IND vs AUS) आणि राहुलचा जम बसलाय असे वाटत असतानाच के एल 32 धावांवर असताना जांपाच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि भारतीय संघाला तिसरा मोठठा धक्का बसला,याचवेळी भारतीय संघ व्यवस्थापणाने उत्तम लयीत असलेल्या अक्षर पटेलला बढती देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि त्यातून सावरण्याआधीच अक्षर कोहलीसोबत एक चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद होवून तंबूत परत गेलाही.

 

यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 4 बाद 151 अशी होती, आणि त्यातही समाधानाची बाब अशी होती की कोहली दुसऱ्या बाजूने आपले 65 वे अर्धशतक पूर्ण करून नाबाद खेळत होता,कोहलीको चेस पसंद आहे हे त्याने अनेकदा सिद्ध करुन दाखवलेले आहेच,मात्र यादरम्यान भारतीय संघ व्यवस्थापण अनेक धक्कादायक निर्णय घेत सर्वानाच अचंबित करुन टाकत होते, त्यांनी सूर्यकुमारला अजूनही खेळायला न पाठवता पांड्याला पाठवले,याजोडीने 34 धावांची भागीदारी करून संघाला विजयाकडे मार्गस्थ केलेय असे वाटत असतानाच भारतीय डावाच्या 36 व्या षटकात जम बसलेल्या कोहलीला अगरने चकवले आणि या चेंडूने चकलेल्या कोहलीच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून गेले, अन पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव सलग तिसऱ्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर त्रिफळाबाद झाला आणि मैदानावर एकच शांतता पसरली, कारण भारतीय अजूनही विजयासाठी 86 धावांची आवश्यकता होती आणि त्यांचे फक्त चारच गडी शिल्लक होते.

 

 

यावेळी सामना आणि मालिका ऑस्ट्रेलियन संघाकडे झुकलाय अशीच परिस्थिती होती.एक तर धावाच निघत नव्हत्या, आणि ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षणासाठी एकेक धाव वाचवण्यासाठी जिवाचे रान करत होते ,साहजिकच भारतीय फलंदाज धावा काढण्यात यशस्वी ठरत नव्हते, याचेच दडपण वाढले आणि ते कमी (IND vs AUS) करण्यासाठी जम बसलेल्या हार्दिक पांड्याने नको ते धाडस केले आणि जांपाने बरोबर तो पुढे येतोय हे ओळखून चेंडूची गती कमी करून डाव साधला,आणि पांड्या  त्या जाळ्यात सहज अडकला.40 चेंडूत 40 धावा काढून पांड्या तंबूत परतताच भारतीय संघ पराभवाच्या खोल गर्तेत पुरताच अडकला.

 

यानंतर जडेजाच एकमेव आणि अंधुकशी आशा होती, पण तो आज पुरताच जखडून पडलेला दिसत होता,एरवी तलवारीसारखी तळपणारी त्याची वय आज मात्र पुरती म्यान झालेली दिसत होते, त्याचदडपणाखाली त्याने मारलेल्या एका आत्मघातकी फटक्याने त्याचा आणि भारतीय संघाची आशा या दोन्हीचाही अस्त झाला आणि मायदेशात जबरदस्त विजयी सातत्य असणारा भारतीय संघ मालिका गमवणार हेच जवळपास स्पष्ट झाले, तरीही क्रिकेट हा अविश्वसनीय चमत्कारांनी भरलेला खेळ माहित असलेल्यांना अजूनही काही तरी चमत्कार घडेल असे वाटत होते ,त्यात शमीने 3 चेंडूत आक्रमक 14 धावा करून थोडीफार आस दाखवली, पण ती क्षणिकच होती, अखेर ऑस्ट्रेलियन संघाने यादवला धावबाद करून भारतीय धरतीवर भारताला पराभूत करत 21 धावांनी सामना आणि मालिका जिंकून कसोटी मालिका गमावण्याचे दुःख काही प्रमाणात का होईना कमी करण्यात यश मिळवलेच,खेळात जर तर ला अर्थ नसतो हे मान्य केले तरी आज भारतीय फलंदाज कर्णधारासहित सर्वच खराब फटके मारून बाद झाले,कोहली तरी स्थिरस्थावर झाल्यावर सहजासहजी बाद होत नसतो,पण आज काहीही शक्य होणार नव्हते,तेच झाले,त्यातच स्मिथने जबरदस्त नेतृत्व कौशल्य दाखवून  भारतीय फलंदाजी पूर्णपणे नामोहरम करत संघाला मालिका जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला.

 

 

द्विपक्षीय मालिकेत भारताला भारतात 2019 पासून सलग तिसऱ्यांदा पराभूत करणारा ऑस्ट्रेलिया एकमेव विदेशी संघ  ठरला आहे.चार महत्वपूर्ण बळी मिळवून संघाला मालिका (IND vs AUS) जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा ऍडम जांपा सामन्याचा तर मिशेल मार्शला त्याच्या झंजावाती आणि सातत्यपूर्ण खेळासाठी मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया
सर्व बाद 269
मार्श 47,हेड 33,वॉर्नर 23,लाबूशेन 28,कॅरी 38,स्टोयनिस 25,अबॉट 26
कुलदीप 56/3,हार्दिक 44/3,सिराज 37/2,अक्षर 57/2
भारत सर्वबाद 248
रोहित 30,गील 37,कोहली 54,पांड्या  40,जडेजा 18,राहुल 32,शमी 14
जांपा 45 /4 , अगर 41/2,स्टोयनिस 43/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.