Pimpri: प्राधिकरणाचा 679 कोटी 89 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा 679 कोटी 89 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज (मंगळवारी) मंजूर करण्यात आला. पाच कोटी 27 लाख 25 हजार रुपये शिलकी रकमेचा हा अर्थसंकल्प आहे. मोशी येथे हेलीपॅड, पेठ क्रमांक 11 येथे संविधान भवन, विपश्यना केंद्र, औद्योगिक संग्रहालय, सांस्कृतिक भवन, ज्येष्ठांसाठी विरंगूळा केंद्र, प्राधिकरणाच्या उद्यानात ओपन जीम यासह गृहप्रकल्प ही अर्थसंकल्पाची वैशिष्टये आहेत.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची 337 वी सभा आज (मंगळवारी) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सदाशिव खाडे होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके यांनी सन 2019-20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सभेला सादर केला. त्यावर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती अर्थसंकल्पाला मंजूरी दिल्याचे, अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी सांगितले. प्राधिकरणाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान घाडगे यांनी हा अर्थसंकल्प तयार केला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना सदाशिव खाडे म्हणाले, ”पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सेक्टर बारा येथे पाच हजार घरे, सेक्टर सहा येथे साडेतीनशे, वाल्हेकरवाडीत 792 घरांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सर्वसामान्याला परवडतील अशी घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात 353.97 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे हेलीपॅड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. औद्योगिकनगरीत जेआरटी टाटा यांच्या नावाने औद्योगिक संग्रहालय उभारण्यात येणार आहे. संग्रहालायात जेआरटी टाटा यांचा मोठा पुतळा उभारला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगूळा केंद्र, प्राधिकरणाच्या उद्यानात ओपन जीम बांधण्यात येणार आहेत.

पेठ क्रमांक 11 येथे सात एकरच्या जागेत देशातील पहिले संविधान भवन उभारण्यात येणार आहे. विपश्यना केंद्र बांधले जाणार असून त्यासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पेठ क्रमांक पाच आणि आठ येथे सोलर पार्कची उभारणी केली जाणार आहे. चिंतामणी चौक ते पॉवर हाऊस येथील 24 मीटर रस्ता विकसित केला जाणार असून त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पेठ क्रमांक 25 येथे सांस्कृतिक भवन बांधण्यात येणार, पीएमपीएलसाठी प्राधिकरणाच्या भूखंडावर सोयी-सुविधायुक्त बस डेपो उभारले जाणार अल्याचे खाडे यांनी सांगितले.

प्राधिकरणाचे शैक्षणिक, वैद्यकीय आणि औद्योगिक भूखंड निविदा पद्धतीने दीर्घ मुदतीने भाडेतत्वार दिले जाणार आहेत. थेरगाव येथील महावितरणसाठी आणि पोलीस चौकीसाठी जागा देण्यात येणार आहे. प्राधिकरणातील कर्मचा-यांना सातवा वेतन लागू केला जाणार आहे. प्राधिकरणातील मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या जागी अनुकंपा तत्वावर त्यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरीत घेतले जाणार असून ती संख्या सात आहे, असे खाडे यांनी सांगितले.

त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके म्हणाले, प्राधिकरणातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बांधण्यात येणा-या घरांची किंमत निश्चित केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 30 स्क्वेअर मीटर घरांची किंमत 9.90 लाख रुपये आहे. तर, निम्न उत्पन गटासाठी 60 स्क्वेअर मीटर घराची किंमत 32 लाख रुपये निश्चित केली आहे.वर्षभरात 177 कोटी उत्पन्न जमा अपेक्षित धरले आहे. प्लॉट विक्रीतून 100 कोटी, अतिरिक्त अधिमूल्य व हस्तांतरण शुल्कातून 17 कोटी, विकास निधीतून आठ कोटी आणि बँकेतील ठेवीतील व्याज (इंटरेस्ट) 26 कोटी असे 177 कोटी उत्पन अपेक्षित आहे. प्राधिकरणाकडे 502 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तर, प्राधिकरणाच्या ताब्यात अकराशे हेक्टर एकर जागा” असल्याचे खडके यांनी सांगितले.

 1. अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये!
  # पेठ क्रमांक 6, 12, 30 आणि 32 येथे गृहयोजना राबविणे – 325 कोटी
  # पेठ क्रमांक 11 येथे संविधान भवन आणि विपश्यना केंद्र बांधणे – 5 कोटी
  # औद्योगिक संग्रहालय, विरंगुळा केंद्रद्र आणि ओपन जिम बांधणे – 8 कोटी
  # पेठ क्रमांक 5 आणि 8 येथे सोलार पार्क उभारणे – 1 कोटी
  # आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रामध्ये हेलीपॅड उभारणे – 1 कोटी
  # चिंतामणी चौक ते पॉवर हाऊस 24 मीटर रूंद रस्ता करणे – 5 कोटी
  # पेठ क्रमांक 25 मध्ये सांस्कृतिक भवन बांधणे व दुरूस्त करणे – 5 कोटी
  # औंध – रावेत रस्त्यावर साई चौकात दोन समांतर उड्डाणपुल बांधणे – 5 कोटी
  # खुले प्रदर्शन केंद्र बांधणे – 44.81 कोटी
-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.