Nigdi : पर्यावरणात संतुलन राखण्यासाठी संचय टाळावा – प. पू. प्रतिभाकुंवरजी 

एमपीसी न्यूज – वर्तमानात कर्म करताना आत्मभावाने आणि सकारात्मकतेने वागून स्वत:सह आपल्या कुटुंबाला आणि आपल्या सहवासात येणा-या सर्वांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करावा. भविष्य काळातील धन संचयासाठी वर्तमानात वाईट काम करू नये. स्वभावातील अहंम्‌पणा दूर करून आताचा क्षण, आजचा दिवस आनंदात घालवावा. आपल्या संस्कृतिचे व संस्काराचे जतन करावे. वीज, पाण्याचा अतिवापर टाळून पर्यावरणात संतुलन राखण्यासाठी कोणत्याही वस्तूंचा संचय टाळावा, असे प. पू. प्रतिभाकुंवरजी  म्हणाल्या.

निगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पर्युषण पर्वनिमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले होते. यावेळी प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू.गरिमाजी म.सा., प.पू.महिमाजी म.सा. आदी ठाणा 6 तसेच संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, संतोष कर्नावट, मनोज सोळंकी आदी उपस्थित होते.

जीवनात सकारात्मकता येण्यासाठी संतांबरोबर राहण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे जीवनात सदगुणांची वाढ होते. त्यासाठी नेहमी सज्जन गृहस्थांच्या संगतीत रहावे. मोहमयी संसारात राहून देखील आपण निस्पृहपणे जगू शकतो, संत आपल्याला मोक्ष मार्ग दाखवितात; परंतु त्यासाठी जीवनात प्रत्येकाला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. जर समर्पण भावनेने संतांनी सांगितलेल्या मार्गाचे आचरण केले तर मोक्ष मार्ग सापडतो, असेही प. पू. प्रतिभाकुंवरजी  म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.