Chikhli : दिपक नागरगोजे व दत्तात्रय राऊत यांना पुरस्कार

एमपीसी न्यूज – स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवाचे औचित्य साधून शरदनगर, चिखली प्राधिकरण येथे दीपक नागरगोजे यांना ‘स्वामी विवेकानंद’ आणि दत्तात्रय राऊत यांना ‘भक्त पुंडलिक’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 
चिखली येथे झालेल्या कार्यक्रमाच्यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, माजी नगरसेवक सुनील लोखंडे, व्याख्यानमाला समन्वयक राजेंद्र घावटे, चित्रकार आदिती हर्डीकर, पळसदेवचे माजी सरपंच हनुमंत बनसोडे, चिखलीचे माजी सरपंच लालासाहेब मोरे, भय्या लांडगे, श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष रामराजे बेंबडे, कार्याध्यक्ष सुनील पंडित, उपाध्यक्ष संतोष ठाकूर, सचिव शंकरराव बनकर, खजिनदार पंढरीनाथ म्हस्के उपस्थित होते. सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये एकवीस हजार, शाल आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. 
पुरस्कारार्थींच्या वतीने दीपक नागरगोजे म्हणाले, , “‘पर्यटक म्हणून या आणि प्रवर्तक म्हणून आपल्या भागात जा!’ या ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी आनंदवन भेटीत दिलेल्या संदेशाने प्रेरित होऊन 27 नोव्हेंबर 2000 रोजी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या आर्वी या छोट्याशा खेड्यात माळरानावर ‘शांतिवन’ या सामाजिक प्रकल्पाची पत्नी कावेरी आणि कुटुंबीय यांच्या आधारे सुरवात केली. अनाथ, बेघर, बालकामगार, तमाशा कलावंतांची मुले, वेश्यावस्तीतील मुले, उपेक्षित, घटस्फोटित, परित्यक्त्या महिला यांचे पुनर्वसन व्हावे, शिक्षण, स्वयंरोजगार यांनी त्यांचे सक्षमीकरण व्हावे हा प्रकल्प उभारणी मागचा उद्देश होता. आता सुमारे तीनशे मुलांना ‘शांतिवन’मध्ये आश्रय मिळालेला असून त्यातले काही आता उच्चशिक्षित झाले आहेत. पाचवीत असताना नर्स व्हायचे स्वप्न पाहणारी एक अनाथ मुलगी आता डॉक्टर झाली आहे. सहानुभूतीची भावना जर प्रत्येकाच्या मनात आली; तर जगात कोणीही अनाथ, वंचित राहणार नाही!” अशा भावना व्यक्त केल्या. महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहतूक खात्यात सेवा करत असलेल्या दत्तात्रय राऊत यांनी आपल्या  मातोश्री आणि पत्नी राजश्री राऊत यांच्या समवेत भक्त पुंडलिक पुरस्कार स्वीकारला.
त्यापूर्वी, सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या कालावधीत श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ पिंपरी (डिस्ट्रिक्ट 3131) आणि जनसेवा फाउंडेशन आय हॉस्पिटल (रानवडी-आंबी) आयोजित मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा परिसरातील गरजूंनी लाभ घेतला.
रामराजे बेंबडे यांनी प्रास्ताविक केले.  उल्हास तापकीर, उत्तम तेलंगे, महेश मांडवकर, राजेश चिट्टे, जयराम पवार, दिलीप मांडवकर, अशोक हाडके, संजय ढंगारे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. अविनाश आवटे यांनी सूत्रसंचालन केले. महादेव कवितके यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.