Pimpri : दुर्गमोहिमेतील बालमावळ्यांचा मराठवाडा जनविकास संघातर्फे सन्मान

एमपीसी न्यूज – ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. यामध्ये “दुर्गजागर” मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सातवी ते नववीच्या 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या बालमावळ्यांनी दहा महिन्यात पुणे जिल्ह्यातील तब्बल 29 किल्ले सर करून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन केले आहे. 

या बालमावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व पुष्पहार देऊन मराठवाडा जनविकास संघातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेश गाटे, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णाजी खडसे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, सहसचिव वामन भरगंडे, पॅसिफिक स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक प्रा. प्रशांत फड, अक्षरा इंटरनॅशनल स्कूलचे प्रा. संजय टाक आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती, राजनीती , पराक्रम या सर्वांचा अभ्यास प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणी जाऊन करता यावा, या हेतूने ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील इतिहासाचे शिक्षक शिवराज पिंपुडे यांनी दुर्गजागर मोहीम आखली. पालकांनाही ट्रेकमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. 29 ट्रेकमध्ये मिळून एकूण 81 पालक सहभागी झाले होते.

अशा प्रकारच्या मोहिमा शाळांमध्ये झाल्या पाहिजेत, असे मत श्रीकृष्ण फिरके यांनी व्यक्त केले. किल्ले सर करण्याचा ट्रेकिंग करणे हा या मोहिमेचा मर्यादित हेतू नव्हता, तर मुलांचा इतिहासाचा अभ्यास व्हावा, त्यांच्या क्षमतांचा कस लागावा, त्यांना गटात काम करण्याची संधी मिळावी, निसर्गाच्या जवळ जाता यावे, त्यांनी साहस अनुभवावे अशा हेतूने या मोहिमेची आखणी करण्यात आली. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला सातवी ते नववीतील सुमारे 72 जणांनी मोहिमेसाठी नोंदणी केली. त्यापैकी 40 विद्यार्थ्यांनी सर्व किल्ले सर केले. श्रीधन मनाटकर यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा गात वातावरण भारावून टाकले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.