Pimpri News : शहरात प्लास्टिक मुक्तीसाठी 25 मे ते 5 जून दरम्यान जनजागृती मोहीम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात 25 मे पासून 5 जून 2022 दरम्यान  जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वतःहून प्लास्टिकमुक्तीची लोकचळवळ उभी करण्यासाठी या मोहिमेत सहभागी होऊन प्लास्टिक वापरास नकार द्यावा. प्लास्टिकमुक्ती मोहीम निरंतर चालू ठेवावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केले.

शहरातील महाविद्यालये,  विविध बिगर शासकीय संस्था, कंपन्या यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.  यावेळी सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, यांच्यासह शहरातील महाविद्यालये, बिगर शासकीय संस्था, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त ढाकणे म्हणाले, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 25 मे 2022 पासून 5 जून 2022 दरम्यान महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये प्लास्टिक वापराचे तोटे, पर्यावरणाला, जैवविविधतेला  प्लास्टिक वापरामुळे निर्माण होणारे धोके याबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना, विद्यार्थी, स्वयंसेवक यांच्या सहभागातून हॉटेल्स, रेस्टॉरंट, किरणा दुकाने, मांस विक्रीची दुकाने, भाजी मंडई, तसेच प्रत्येक घरी जाऊन प्लास्टिकमुक्ती बद्दल जनजागृती करण्यात येणार आहे.

ग्रीन मार्शलच्या माध्यमातून बंदी असलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर करणाऱ्या नागरिक आणि व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शहरात महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत लोक सहभागातून प्लॉगेथॉन मोहीम राबविण्यात येणार आहे. 26 मे  रोजी “अ” आणि “ब” क्षेत्रीय कार्यालय,  27 मे  रोजी “क” आणि “ड” क्षेत्रीय कार्यालय, 28 मे रोजी “इ” आणि “फ” क्षेत्रीय कार्यालय, 29 मे  रोजी “ग” आणि “ह” क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सकाळी 8 ते 10 या वेळेत प्लॉगेथॉन मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगून शहरातील प्रत्येक नागरिकांना प्लॉगेथॉन मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन  अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी केले.

शहरात ओला- सुखा  कचरा विलगीकरण करण्याचे  90 टक्यांपर्यंत पोहचले आहे. शहरात स्वच्छतेच्या बाबतीत कमालीची जागरुकता निर्माण झाली आहे.  लवकरच पिंपरी चिंचवड शहराला  स्वच्छतेच्या बाबतीत देशातील पहिल्या पाच शहराच्या यादीत स्थान मिळेल अशी शक्यता देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.