Bhosari : भोसरी एमआयडीसीमधील अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडले

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी परिसरातील अॅक्सिस बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले. मात्र, चोरट्यांनी मशीन फोडण्यात यश आले नसून चोरट्यांनी एटीएम सेंटरमधील बॅट-या चोरून नेल्या आहेत. ही घटना शनिवारी (दि. 4) रात्री उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी परिसरात महात्मा फुले नगर ते लांडेवाडी रस्त्यावर अॅक्‍सीस बँकेचे एटीएम आहे. अज्ञात चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेरा छताच्या दिशेला फिरवला आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांना मशीन फोडण्यात यश आले नाही. त्यामुळे त्यांनी सेंटरमधील बॅटरी चोरून नेल्या.

विशेष तपास पथक (एसआयटी) आणि गुन्हे शाखेचे कर्मचारी संयुक्‍तरित्या शनिवारी रात्री भोसरी एमआयडीसी परिसरात गस्त घालत होते. ते भोसरी एमआयडीसीतील महात्मा फुले नगर ते लांडेवाडी रस्त्यावर आले असता त्यांना अॅक्‍सीस बँकेच्या एटीएममधील लाइट बंद दिसल्या. त्यामुळे पोलिसांनी एटीएम सेंटरमध्ये जाऊन पाहिले असता एटीएममधील बॅटऱ्या चोरून नेल्याचे निदर्शनास आले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे.

लॉकडाऊन सुरू असल्याने भोसरी एमआयडीसीसह शहरातील सर्वच भागात शुकशुकाट आहे. रस्त्यावर केवळ पोलीस आणि अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या यंत्रणा दिसत आहेत. विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. तरीही पोलिसांची नजर चुकवून अशा घटना घडत आहेत, त्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.