Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील राम-लक्ष्मणाच्या मूर्तीला मिशा असाव्यात – संभाजी भिडे

हिंदू समाजाने सध्या कोरोनाची परिस्थिती असली तरी कोरोनाला न घाबरता दिवाळी आणि दसऱ्याप्रमाणे हा सोहळा साजरा करावा. ; The idol of Ram-Lakshmana in the Ram temple should have a mustache - Sambhaji Bhide

एमपीसी न्यूज – आतापर्यंत फोटोमधून आपल्याला चुकीच्या पद्धतीने राम दाखवले गेले. निदान अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरातील रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अयोध्या राममंदिर समितीला केली आहे.

‘एबीपी माझा’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.  अयोध्येतील राममंदिराचे भूमीपूजन येत्या 5 ऑगस्टला होणार आहे. या सोहळ्याबाबत आज सांगली येथे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, 500 वर्षांपासून अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न सुरु होता आणि आता तो साकारला जात आहे. देशातील तमाम हिंदू समाजासाठी ही आनंदाची बाब आहे.

त्यामुळे देशातील हिंदू समाजाने सध्या कोरोनाची परिस्थिती असली तरी कोरोनाला न घाबरता दिवाळी आणि दसऱ्याप्रमाणे हा सोहळा साजरा करावा.

तसेच प्रत्येकाने यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनही करावे, असे आवाहन संभाजी भिडे यांनी केले आहे.

मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम-लक्ष्मणाच्या मूर्त्यांना मिशा असाव्यात, अशी विनंती भिडे गुरुजींनी केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निमंत्रण नसेल तरी अयोध्याला जावे, असा सल्ला भिडे गुरुजींनी दिला आहे.

शरद पवार यांनी राम मंदिर भूमीपूजनाबाबत केलेल्या विरोधावरून निशाणा साधताना भिडे गुरुजी म्हणाले की, शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेतृत्वाने अशा या पवित्र सोहळ्याला विरोध करणे योग्य नाही.

त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत गौरवोद्गार काढताना ते म्हणाले की, ठाकरे यांचे नेतृत्व अत्यंत चांगलं असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची कामगिरी उत्तम राहिली आहे.

त्यांनी आता महाराष्ट्रभर फिरून कोरोनाच्या बाबतीत असणारी भीती दूर करावी.

शिवसैनिकांनी ऑनलाईन भूमिपूजन करण्याची केलेली मागणी बाळासाहेब ठाकरे यांना आवडली नसती, असं देखील ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना जरी अयोध्या भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण नसले तरी त्यांनी अयोध्येला गेले पाहिजे. कारण त्यांना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही, असं मतही भिडे गुरुजी यांनी यावेळी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.