Pimpri: आझम पानसरे यांना तिस-या वेळेसही डावलले! 

विदर्भातील अरुण अडसर यांना विधानपरिषदेची उमेदवारी

एमपीसी न्यूज – भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवर पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचे पुनर्वसन केले जाईल असे बोलले जात होते. त्यासाठी शहरातील आमदार, पदाधिका-यांनी चार दिवस मुंबईत तळ ठोकला. वरिष्ठ नेत्यांच्या गाठी-भेटी घेऊन पानसरे यांना संधी देण्याची मागणी केली. परंतु, पक्षाने पुन्हा पानसरे यांच्याकडे दुर्लक्ष केले असून विदर्भातील नेते अरुण अडसर यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, पानसरे यांना डावल्यामुळे समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून चलबिचल सुरु आहे. आगामी निवडणुकीत भाजपला त्याचा फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकरांकडून व्यक्त केली जात आहे.

आझम पानसरे पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते आहेत. पिंपरी मतदार संघात त्यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दोनवेळा शहराध्यपद भूषविले असून ते शहराचे महापौर देखील होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्षपद देऊन (राज्यमंत्री) लाल दिवा दिला होता. परंतु, त्यांचे त्यावर समाधान झाले नव्हते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ्रेबुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पानसरे भाजपवासी झाले. त्यांच्या प्रवेशामुळे शहरात भाजपची ताकद वाढली. पालिकेत भाजपची सत्ता आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. परंतु, भाजपात प्रवेश करुन दोन वर्षाच्या काळ लोटत आला तरी त्यांना कोणतेही पद दिले गेले नाही.

पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर 11 जागा निवडून दिल्या. त्यामध्ये पानसरे यांचा समावेश होईल अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, त्यावेळी त्यांना डावलण्यात आले. त्यानंतर प्राधिकरण नाहीतर एखादे महामंडळ मिळेल, अशी चर्चा होती. परंतु, त्यामध्येही पानसरे यांना नाव डावलण्यात आले. विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत पानसरे यांना संधी देण्यासाठी शहरातील नेत्यांनी मुंबईत तळ ठोकला होता. पानसरे यांच्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे शब्द टाकला. परंतु, पुन्हा पानसरे यांना डावलण्यात आले. त्यामुळे पानसरे समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

आता दोन वर्ष विधानपरिषदेची देखील निवडणूक नाही. महत्वाच्या महामंडळाच्या बहुतांश नियुक्त्या झाल्या आहेत. विधानसभा निवडणूक 13 महिन्यावर आली आहे. त्यामुळे पानसरे यांना पदासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. पानसरे यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही. मावळ लोकसभा मतदार संघात येणा-या पिंपरी विधानसभा मतदार संघावर त्यांची पकड आहे. त्यांचे पाठिराखे मोठ्या संख्येने आहेत. पिंपरी मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून पानसरे ज्यांच्यासोबत तोच आमदार होतो, असा इतिहास आहे. त्यामुळे भाजपाला आता पिंपरी मतदार संघ ताब्यात घेण्यास अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.