Pimpri News: रिक्षा , टॅक्सी चालकांसाठी, परिवहन विभाग,अंतर्गत स्वतंत्र मंडळ आवश्यक : बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने कल्याणमंडळ स्थापन करताना सर्वांना विश्वासात घेणे आवश्यक होते. पण, विश्वासात न घेताच मंडळ स्थापन केले. रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी, परिवहन विभाग,अंतर्गत स्वतंत्र मंडळ आवश्यक असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले. सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

असंघटित रिक्षा, टॅक्सी चालक, ट्रक चालक, यांच्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवरती कल्याणमंडळ स्थापन करण्यास परवानगी दिली. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी रिक्षा चालक व त्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा न करता एकतर्फी चुकीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रिक्षा टॅक्सी चालक मालकांचे मोठे नुकसान होणार आहे. रिक्षा व टॅक्सी चालकांची फसवणूक असून मुश्रीफ यांच्या या निर्णयाला आम्ही तीव्र विरोध करणार आहोत. पुणे ,पिंपरी-चिंचवड,मुंबई, ठाणेसह महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे कांबळे सांगितले.

बाबा कांबळे म्हणाले, रिक्षा , टॅक्सी चालक हा स्वयं रोजगार करणार असून त्यास कामगार म्हणता येणार नाही. रिक्षा चालकांचे सर्व कामकाज परिवहन विभाग अंतर्गत करण्यात येत असून, लायसन्स बॅच, परवाना , परिवहन विभाग देत आहे, यामुळे परिवहन विभाग अंतर्गत रिक्षा , टॅक्सी चालक मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे अशी आमची मागणी आहे. परंतु कामगार मंत्री हसन मुश्रीफ मात्र कामगार विभाग सोडून परिवहन संबंधित असलेल्या विभागात वरती अतिक्रमण करत आहे.

कामगार विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या असंघटित कामगारांसाठी स्थापन झालेल्या मंडळातील कामगारांना अजून ते न्याय देऊ शकले नाही. कामगार विभागाकडे यापूर्वी असलेलं घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ , बांधकाम कामगार कल्याण मंडळ , सुरक्षा रक्षक मंडळ यांना न्याय देण्यास व त्यांचे प्रश्‍न सोडवण्यास कामगार विभाग अपयशी झालेला आहे, असा आरोपही बाबा कांबळे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.