Bachchan Family: अमिताभ-अभिषेक कोरोना ‘पॉझिटीव्ह’ तर जया, ऐश्वर्या, आराध्या ‘निगेटीव्ह’

Bachchan Family: Amitabh-Abhishek Corona 'Positive', Jaya, Aishwarya 'Negative' अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन दोघांची प्रकृती स्थिर, सौम्य खोकला आणि बारीक तापावर उपचार सुरू

एमपीसी न्यूज – महानायक अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन या पिता-पुत्रांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यानंतर ते मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, सून ऐश्वर्या व नात आराध्या या तिघांच्या कोरोना चाचण्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.

अमिताभ व अभिषेक यांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यात दोघेही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांना सौम्य खोकला आणि बारीक ताप असल्याचे नानावटी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. पाटकर यांनी सांगितल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोेपे यांनी दिली.

नानावटी रुग्णालयातील 11 नंबरच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये बच्चन पिता-पुत्रांवर उपचार सुरू आहेत, असे रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मुंबईतील अमिताभ बच्चन यांच्या तिन्ही बंगल्यांचे आज महापालिकेच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात करण्यात आहे.

बच्चन कुटुंबातील दोघांना कोरोना संसर्ग झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अभिषेक बच्चन याने रात्री उशिरा ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याने म्हटले आहे की, ‘मी आणि माझे वडील अशा दोघांचा कोरोना चाचणीचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे. आम्हा दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे असून आम्ही रुग्णालयात दाखल झालो आहोत. आम्ही याबाबत सर्व आवश्यक अथॉरिटीजना माहिती दिली असून आमच्या परिवारातील सर्व सदस्य तसेच सहकारी कर्मचारी यांच्याही कोरोना चाचण्या केल्या आहेत. कोणीही घाबरून जाऊ नये, शांत राहावे, ही विनंती, धन्यवाद!’

गेल्या दहा दिवसात आपल्या निकटच्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही ‘बिग-बीं’नी केले आहे.

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची बाधा झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे असंख्य चाहते बीग-बी लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करीत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून अमिताभ बच्चन लवकर बरे व्हावेत, म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.