Pune : ही शिवशाही आहे की ‘घाम’शाही ?

एमपीसी न्यूज- एस टी महामंडळाच्या सध्या लाल रंगाच्या बसच्या बिघाडासंदर्भात प्रवाशांना अतोनात हाल सोसावे लागल्याची अनेक उदाहरणे ऐकायला मिळतात. परंतु, शिवशाही सारख्या आरामदायी, आलिशान बसच्या बाबतीमधील एक प्रसंग अक्षरशः घाम फोडायला लावणारा आहे. हा बाका प्रसंग मंदार आडकर या प्रवाशाला अनुभवाला मिळाला. हा अनुभव ऐका मंदार आडकर यांच्याच शब्दात…….

"आज सकाळी नाशिक ते पुणे शिवशाही बसमध्ये सकाळी पावणेनऊ वाजता बसलो. उन्हाळा असल्याने AC बस चांगली म्हणून शिवशाही पकडली. पण बसल्यावर लक्षात आले की माझ्या सीटवर असलेला AC व्हेन्ट बसला धक्के बसले की आपोआप बंद होत होता. कसंबसं अर्धा तास प्रयत्न करून तो एकदाचा स्थीर केला. पण पुढे अजून फक्त दीड तास प्रवास झाला आणि संपूर्ण बसचा AC बंद पडला. ड्रायव्हरने थोड्याच अंतरावर असलेल्या एका गॅरेजमध्ये गाडी नेली पण तिथे काहीच काम झाले नाही"

"आता ही "शिवशाही" बस असल्याने त्याच्या खिडक्या उघडत नाहीत आणि त्यात भर दुपारच्या एक वाजताचा प्रवास आणि ट्रॅफिक पण खूप त्यामुळे आतल्या सर्व प्रवाशांना अक्षरशः घामाची अंघोळ होत होती. सर्वजण ड्रायव्हरला विनंती करत होते परंतु ड्रायव्हरने प्रवाशांची कसलीही चिंता न करता बस अडीच तासांचा प्रवास करत शिवाजीनगरपर्यंत आणली. मी बस मधून एसटी महामंडळाच्या टोल फ्री नंबरवर फोन केला, पण 20 मिनिटे मला फक्त त्यांची जाहिरात ऐकायला मिळाली आणि मी वैतागून फोन कट केला. जवळ जवळ अडिच तास बसमधल्या अबाल वृद्धांचे भयानक उकाड्याने अतोनात हाल झाले"

"या अनुभवावरून मला असे वाटते की एसटी महामंडळाने सर्व AC बसला AC बंद झाल्यावर व्हेंटिलेशनसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची सोय केलीच पाहिजे तसं छताला दोन ठिकाणी छोटे व्हेन्ट आहेत पण त्याचा काहीच उपयोग नाही आणि आजच्या सारखा एखादा प्रसंग उद्भवलाच तर प्रवाशांना त्यांचे पूर्ण पैसे परत केले पाहिजेत आणि झालेल्या गैरसोयीची भरपाई म्हणून पुढचा एक प्रवास फ्री दिला पाहिजे"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.