Bajaj Auto News: राहुल बजाज यांनी दिला बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, नीरज बजाज नवे अध्यक्ष

एमपीसी न्यूज – राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची जागा कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नीरज बजाज घेतील.

राहुल बजाज हे उद्या (30 एप्रिल) बिझिनेस डायरेक्टर व नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि कंपनीचे अध्यक्ष म्हणून पदभार सोडतील, अशी माहिती कंपनीने आज एक्सचेंज फाइलद्वारे दिली.

“मागील पाच दशकांपासून कार्यरत असलेल्या अध्यक्ष बजाज यांनी आपले वय लक्षात घेऊन राजीनामा दिला आहे,” असे कंपनीने सांगितले.

एक मेपासून पुढील पाच वर्षांकरिता राहुल बजाज यांना बजाज ऑटोचे अध्यक्ष इमेरिटस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल बजाज यांनी गेल्या पाच दशकांत कंपनी आणि समूहाच्या यशासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांचा जबरदस्त अनुभव आणि कंपनीच्या हिताचा विचार करता, नामनिर्देशन व मोबदला समितीने केलेल्या शिफारशीनुसार संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत राहुल बजाज यांना कंपनीचे अध्यक्ष इमेरिटस म्हणून पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यासाठी मान्यता दिली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.