BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : बजाज कंपनीतर्फे २०० वाहतूक पोलिसांना सुरक्षा साहित्याचे वाटप

एमपीसी न्यूज – बजाज कंपनीतर्फे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील २०० वाहतूक पोलिसांना जॅकेट्स, मास्क, बॅटन आणि गॉगल्स अशा सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे वाहतूक पोलिसांना वाहतूक नियोजन करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. हिंजवडी येथील हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात या साहित्याचे वितरण करण्यात आले.

साहित्य वितरण कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त नीलिमा जाधव, बजाज कंपनीचे संजय खडसे, समीर चौघुले, वाहतूक विभागाचे सर्व पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

पोलिसांचे काम कायम प्रदूषणात असते. त्यामुळे त्यांच्या शरीरात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढते. हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक वाहतूक विभागात काही रुग्णालये ठरवून देण्यात आली आहेत. वाहतूक पोलिसांना संबंधित रुग्णालयात ऑक्सिजन घेण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेचे प्रात्यक्षिक या कार्यक्रमात दाखविण्यात आले.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई म्हणाले, बजाज कंपनीने सीएसआर फंडातून ही मदत केली आहे. यामुळे वाहतूक पोलिसांना मोठी मदत होणार आहे. वाहतूक पोलिसांना दररोज प्रदूषणाचा सामना करावा लागतो. नागरिक अजूनही वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालतात. हिंजवडी आणि चाकण परिसरात हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक नियमांबाबत, वाहतुकीची शिस्त पाळण्याबाबत साक्षर करण्याची गरज आहे.

बजाज कंपनीचे संजय खडसे म्हणाले, पोलिसांचे सहकार्य नेहमी मिळते. पोलीस समाजाची सेवा करतात. बजाज कंपनीला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. पोलीस सतत त्यांचे कर्तव्य बजावत असतात. प्रत्येकाला हेवा वाटावा असे त्यांचे काम असते.

 

Advertisement

HB_POST_END_FTR-A3