Pimpri News: जखमी वासरांसह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे पालिकेसमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – भटक्या कुत्र्यांच्या आणि वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वासरांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात उपचार मिळाले नसल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज (गुरुवारी) सकाळी पालिकेसमोर आंदोलन केले. दरम्यान, वासरांवर उपचार केले असून त्यांना पांजरपोळमध्ये सोडणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले.

बजरंग दलाचे कुणाल साठे म्हणाले, पिंपरीगावात जखमी अवस्थेत दोन वासरे आढळली. दोनही वासरे चार दिवसांची होती. एका वासरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. तर, दुसरे वासरू ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर प्रथमोपचार केले.

त्यानंतर या वासरांना महापालिकेच्या पशुवैद्यकीय रूग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. पण, तिथे उपचाराची सुविधा उपलब्ध झाली नाही.

वासरांना औंधला न्यायला सांगितले. त्यामुळे वासरांसह पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. प्रशासनाची तारांबळ उडताच अधिकारी, पदाधिकारी खाली आले. तसेच मोकाट कुत्र्यांना पकडण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार महिन्यात दोनशे मोकाट जनावरे पकडणार असल्याचे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

 अतिरिक्त आयुक्त अजित पवार म्हणाले, ”वासरांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यात वासरे जखमी झाली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी चावा घेतला होता. मी स्वत: आंदोलकांना भेटलो. वासरांना पशुवैद्यकीय विभागात घेवून गेलो होतो. वासरांवर योग्य ते उपचार केले आहेत. वासरांना पांजरपोळला नेले जाणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.