Maval : बाळा भेगडे यांना तिसऱ्यांदा भाजपची उमेदवारी! 

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार व राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांना तिसऱ्यांदा अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. 
मावळात भाजपमध्ये तीन इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी तीव्र चुरस असल्याने पहिल्या उमेदवार यादीत मावळबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला होता. तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके व भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी बाळा भेगडे यांच्यापुढे पक्षांतर्गत मोठे आव्हान उभे केले होते. पक्षाकडून अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नसतानाच या तिन्ही इच्छुकांनी उद्या (गुरुवारी) शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मावळात भाजपमध्ये बंडखोरी अटळ असल्याचे चित्र आहे.

भाजपने आज रात्री उशिरा १४ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात बाळा भेगडे यांचे नाव असलेल्या त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. मावळातील उमेदवारीची घोषणा लांबल्याने आशा उंचावलेल्या सुनील शेळके व रवींद्र भेगडे यांच्या समर्थकांची मात्र घोर निराशा झाली. आता ही नाराजी दूर करून बंडखोरी टाळण्याचे मोठे आव्हान बाळा भेगडे व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपुढे असणार आहे.
मावळात भाजपने यापूर्वी कोणालाही आमदारकीसाठी तिसऱ्यांदा संधी दिली नव्हती. त्यामुळे बाळा भेगडे यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवत ती परंपरा खंडित केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राज्यमंत्रिपद मिळाल्याने उमेदवारीच्या लढतीत भेगडे यांचे पारडे जड ठरले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.