Maval : बाळासाहेब नेवाळे यांचा मावळच्या सक्रिय राजकारणाला रामराम

पुणे जिल्हा बँक व दुध संघाच्या संचालक पदाचा दिला राजीनामा

एमपीसी न्यूज – मावळात पैशापुढे माणूस व राष्ट्रवादी पक्ष हारला आहे. ज्या पक्षाला धोरण तत्व व विचार राहिला नाही. त्यांच्या सोबत राहणे क्लेशदायक असल्याने यापुढे सक्रिय राजकारणाला रामराम करण्याचा निर्णय मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला.

नेवाळे म्हणाले 25 वर्षाच्या राजकिय कारकिर्दीला पूर्णविराम देताना प्रचंड वेदना होत आहे. मात्र, सध्या मावळचे राजकारण हे विचारांचे व तत्वाचे राहिले नसून येथे प्रचंड दहशत व पैसा यांचा वापर होऊ लागला आहे. गुन्हेगारी वाढली आहे, यामुळे चांगली माणसं राजकारणात येणार नाहीत व आली तरी टिकणार नसल्याने राजकारणातून अलिप्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे मी कोणतीही निवडणूक लढणार नाही तसेच कोणत्या पक्षाचे काम करणार नाही असे सांगत एक प्रकारे राजकिय संन्यास घेतल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले.

नेवाळे म्हणाले मावळात राष्ट्रवादी पक्ष पैशापुढे हारला आहे. समाजकारण व राजकारणात मंडळी समाजासाठी वैयक्तिक जीवनाचा त्याग करतात, समाजाला वेळ देतात, त्यांच्या सुख दुखात सहभागी होतात, असे असताना कोणीतरी पैसे घेऊन येतो व या विचारांना तिरांजली देतो, त्याला माणूस व पक्ष देखील बळी पडत आहे.

मावळच्या ग्रामीण भागात प्रचंड दहशत होत असल्याने ग्रामीण माणूस जीव मुठीत धरून जगत आहे. ज्या समाजाकरिता राजकारण करायचे त्याच समाजासमोर जीव जाणार असेल तर राजकारण थांबविलेले बरे हा विद्विग्न विचार मनात घेऊन राजकारणातून बाहेर पडत चांगलं जीवन जगण्याचे ठरविले आहे. माझ्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी व दहशतीचा सामना करावा लागत असेल तर ते मला मान्य नाही, आमच्यावर झालेला अन्याय साहेब व दादांना समजत नसेल तर काय उपयोग आहे, अशी खंत नेवाळे यांनी व्यक्त केली.

मी 25 वर्ष राजकारणात आहे, असे असताना अचानक राजकारणाचा त्याग करण्याचा निर्णय आनंदाने घेतलेला नाही. हा निर्णय घेताना किती वेदना व आघात माझ्यावर झाला असेल याचा विचार कोणी करु शकत नाही. मावळचे राजकारण वेगळ्या दिशेने जात असल्याने ग्रामीण भागाचा विकास होईल असे वाटत नाही.

मावळच्या नागरिकांनी तालुक्याच्या विकासाकरिता योग्य माणसाला कौल द्यावा, अशी विनंती नेवाळे यांनी मावळवासीयांना केली. नेवाळे यांच्या या भूमिकेमुळे मावळचे राजकारण ढवळून निघणार असून या निर्णयामागील उद्विग्नता तालुक्याला विचार करायला लावणारी आहे हे मात्र नक्की.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.