Maval : कार्यकर्त्यांच्या मनधरणीनंतर राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा बाळासाहेब नेवाळे यांचा निर्णय

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे राजीनामे मागे घेऊन बाळासाहेब नेवाळे यांनी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय व्हावे म्हणून समर्थक कार्यकर्त्यांनी नेवाळे यांच्या घरासमोर ठिय्या देऊन त्यांची मनधरणी केल्यानंतर, अखेर कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करीत राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय नेवाळे यांनी घेतला. ते भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर सभेत टीका केल्यामुळे दुखावल्या गेलेल्या नेवाळे यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा नेवाळे यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यांच्या काही समर्थकांनी त्यांच्या पदांचे राजीनामे देऊन दबाव निर्माण केला होता.

नेवाळे यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी दोन दिवस ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रयत्नशील होते. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सातशे ते आठशे कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर धरणे धरले. तुम्ही राजकारणातून अलिप्त होण्याचा निर्णय व राजीनामे मागे घ्या, तुम्ही कोणत्याही पक्षात जा आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण राजकारणातून अलिप्त होऊ नका, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले.

ग्रामीण भागाला तुमचा आधार आहे, अनेक तरूणांना आपण राजकारणात संधी दिली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व दूध संघ निवडणूक स्वत:च्या ताकदीने लढवली होती, त्यात पक्षाचा काहीही सबंध नव्हता. त्यामुळे पवार यांच्या टीककडे दुर्लक्ष करा, जिल्हा दूध संघाचा कायापालट अध्यक्षपदाच्या काळात तुमच्या पुढाकाराने झाला, हे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले.

सहकार क्षेत्रातील आपल्या कामासोबत वारकरी संप्रदायातील काम देखील उल्लेखनीय आहे, असे सर्वसामान्य कार्यकर्ते समजावून सांगत असताना अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. महिलांनी देखील नेवाळे यांना राजकारणात सक्रिय राहण्याची विनंती केली. ग्रामीण भाग वाऱ्यावर सोडता का, असा जाबही समर्थकांनी विचारला. नेवाळे यांनी तासभर शांत बसून ऐकण्याची भूमिका घेतली. लोक अधिक आरडाओरडा करायला लागल्याने नेवाळे यांनी त्यांच्या भावनांचा आदर करून तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या संकेत दिले. त्यावेळी समर्थकांनी टाळ्या वाजवून निर्णयाचे स्वागत केले.

नेवाळे यांच्यावर राष्ट्रवादीने अन्याय केला, त्यामुळे नेवाळे भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती अतिष परदेशी, पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक हुलावळे, लक्ष्मण बालगुडे, हरीश कोकरे, दत्तात्रेय शेवाळे, रमेश गायकवाड, शुभांगी राक्षे, प्रकाश पवार, माऊली आढाव, ज्ञानेश्वर निंबळे, अमोल केदारी, सोमनाथ शिंदे, बाबाजी काटकर, रूपेश घोजगे, संभाजी टेमघिरे, संतोष राऊत आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like