Vadgaon Maval News : बाळासाहेब नेवाळे यांचे संचालक पद कायम

राज्याचे सहनिबंधक बी एल जाधव यांचे आदेश

एमपीसी न्यूज – सलग तीन मासिक सभांना गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ मर्या. कात्रजचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांचे संचालक पद रद्द झाल्याबाबत पुणे विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांनी आदेश दिला होता. याच्या विरोधात नेवाळे यांनी पुनरीक्षण अर्ज राज्याचे सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांच्याकडे केला. सहनिबंधक बी एल जाधव यांनी नेवाळे यांचे संचालक पद कायम ठेवत पुणे विभागीय उपनिबंधकांचा आदेश रद्द केला आहे.

कामशेत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत नेवाळे यांना अटक झाली होती. त्यामुळे ते 22 फेब्रुवारी ते 22 जुलै याकाळात न्यायालयीन कोठडीमध्ये होते. त्यामुळे ते दूध संघाच्या फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यातील सलग तीन मासिक सभांना गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द ठरविल्याचा आदेश 22 ऑक्टोबर रोजी जिल्हा दूध संघाने घोषित केला होता.

या आदेशा विरोधात नेवाळे यांनी सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध), महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर सुनावणी करताना नेवाळे हे न्यायालयीन कोठडीत असताना 28 एप्रिलची मासिक सभा होण्यापूर्वी येरवडा कारागृहातील न्यायालयीन कोठडीतून मासिक सभेस गैरहजर राहणेबाबत कळवले होते व हे पत्र संघाला सभेच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 एप्रिलला प्राप्त झाले होते.

त्यामुळे संघाने नेवाळे यांचे सदस्यत्व रद्द केल्याचा आदेश सहनिबंधक पाटील यांनी रद्द केल्याचा आदेश दिला. या आदेशामुळे नेवाळे यांचे जिल्हा दूध संघाचे संचालकपद कायम राहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.