Balewadi: ‘पुणे तिथे काही नाही उणे, पीएम, सीएमने फक्त निधी देणे’

पालकमंत्री गिरीश बापट यांची पुणेरी टोलेबाजी 

एमपीसी न्यूज –  हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या तिस-या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (मंगळवारी) भूमीपूजन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणे यावेळी झाली. परंतु, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणेरी टोलेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली. ‘पुणे तिथे काही नाही उणे, पीएम, सीएमने फक्त निधी देणे’ आणि आम्ही विकास कामे करणे. तसेच 70 वर्षात पुण्यासाठी एवढा निधी मिळाला नाही, तेवढा निधी गेल्या साडेचार वर्षात मिळाला असल्याचेही ते म्हणाले.

बालेवाडीतील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  भूमीपूजन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पुरी, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते.

गिरीश बापट म्हणाले, ‘पुणे तिथे काही उणे नाही असे म्हटले जाते. पुण्यात काहीच उणे राहिले नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी द्यावा. आम्ही विकास कामे करत राहतो. 70 वर्षात पुण्यासाठी एवढा निधी मिळाला नाही, तेवढा निधी गेल्या साडेचार वर्षात पुण्यासाठी मिळाला आहे’.

‘मेट्रोमुळे केवळ वीस मिनिटात पुणेकर पुण्याच्या कुठल्याही कोप-यात पोहोचेल. हीच आमची प्रगती आहे. शहराची लोकसंख्या वाढत आहे. लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे ही हिंजवडी मेट्रो पुढील काळात हडपसर पर्यंत करावी लागेल. वीस हजार कोटी रुपये पुणे आणि पीएमआरडीएमार्फत मेट्रोसाठी खर्च करण्यात येत आहेत.

16 हजार 800 कोटी रुपये खर्च करुन पुण्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग केला  जाणार आहे. यामध्ये संत तुकाराम महाराज मार्ग तयार करण्यात येत आहे. आगामी काळात 41 हजार कुटुंबांना स्वतःच हक्काचं घर मिळणार आहे’,बापट म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.