Balewadi : मतमोजणीची प्रशासकीय तयारी पूर्ण; म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलात होणार मतमोजणी

पोलिसांकडून तगडा बंदोबस्त; कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक लक्ष

एमपीसी न्यूज – सतराव्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या गुरुवारी (दि. 23) मतमोजणी होणार आहे. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडासंकुल येथे होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ओळखपत्रधारक अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधींना सातच्या आत केंद्रावर प्रवेश
भारतीय निवडणूक आयोगाकडून उमेदवार प्रतिनिधी, काउंटिंग स्टाफ आणि संबंधित प्रशासकीय अधिका-यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय मतमोजणी केंद्रावर तसेच म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडासंकुल परिसरात प्रवेश देण्यात येणार नाही. उमेदवाराला सोडण्यासाठी आलेल्या वाहनचालकांना देखील वाहन पार्क करून बाहेर जावे लागणार आहे.

  • सातच्या आत येणा-या ओळखपत्रधारकांच्या वाहनांसाठी क्रीडासंकुलाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलाच्या म्हाळुंगे बाजूकडून मुख्य प्रवेशद्वार असणार आहे. या प्रवेशद्वारातून सकाळी सातच्या आत वाहनांना प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर कोणत्याही वाहनांना आतमध्ये सोडले जाणार नाही. उमेदवारांचे प्रतिनिधी, काउंटिंग स्टाफ आणि संबंधित अधिका-यांना सातपूर्वी मतमोजणी केंद्रावर यावे लागणार आहे.

पक्षांच्या कार्यकर्त्यांना थांबण्याची सोय
सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे थांबण्याची व्यवस्था केली आहे. भाजपा, शिवसेना, रिपाइं (अ), राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीच्या मावळ आणि शिरूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी ऑर्चिड हॉटेलपासून म्हाळुंगे गावाकडे जाणा-या रस्त्यावर म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलाच्या बाजूला थांबण्याची व्यवस्था केली आहे. म्हाळुंगे चौकी ते जिजामाता चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर कार्यकर्ते थांबू शकणार आहेत.

  • काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या मावळ आणि शिरूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलाच्या हॉटेल हॉलिडे इनकडील बाजूला थांबण्याची व्यवस्था केली आहे.

बहुजन वंचित आघाडी आणि अन्य पक्षांच्या मावळ आणि शिरूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलाच्या चार नंबर गेटच्या बाजूला थांबण्याची व्यवस्था केली आहे.

  • मतमोजणी केंद्राला थ्री लेयर सिक्योरिटी
    मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलात बॅडमिंटन ग्राउंड येथे होणार आहे. या ग्राउंडला पूर्णतः बंदिस्त करण्यात आले आहे. चारही बाजूंनी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. तसेच ईव्हीएम मशीनच्यापासून काही अंतरावर केंद्राच्या राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या गोलाकार तैनात करण्यात आल्या आहेत. याध्ये एकूण 56 शस्त्रधारी पोलीस आहेत. त्यानंतर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात आहेत. यातही एकूण 56 शस्त्रधारी पोलीस आहेत. केंद्र आणि राज्य राखीव पोलिसांनी केलेल्या सुरक्षाकडीच्या बाहेर स्थानिक पोलीस पहारा देणार आहेत. यामध्ये दोन पोलीस उपायुक्त, 7 सहाय्यक पोलीस आयुक्त, 16 पोलीस निरीक्षक, 52 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि 374 पोलीस कर्मचारी असा एकूण 563 पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.

मतमोजणी केंद्रावर केवळ दोन जणांना मोबाईल फोन वापरण्यास परवानगी
मतमोजणी केंद्रावर कोणालाही मोबाईल फोन वापरण्यास परवानगी नाही. काउंटींग स्टाफ आणि पोलिसांसाठी मोबाईल स्टॅन्ड तयार केले आहेत. सकाळी सर्वांनी आपले मोबाईल फोन त्या स्टॅन्डमध्ये ठेवायचे आहेत. केवळ निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनाच केवळ मोबाईल फोन वापरण्यास परवानगी आहे. उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी आणि अन्य सर्वांना मोबाईल फोन वापरण्यास मनाई आहे.

  • मतमोजणीपूर्वी अर्धा तास उघडणार मतमोजणी केंद्राचे सील
    मतमोजणीला सकाळी सातवाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्राचा परिसर सील करून ठेवण्यात आला आहे. हे सील सकाळी साडेसहा वाजता उघडले जाणार आहे. यावेळी निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रतिनिधी यांनाच थांबता येणार आहे. त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही सील उघडताना प्रवेश मिळणार नाही. दिवसभर मतमोजणी केंद्रावर मतमोजणीचे काम सुरु राहणार आहे. त्यामुळे हवेच्या व्हेंटिलेशनसाठी अर्धा तास अगोदर सील उघडण्यात येणार आहे.

प्रत्येक विधानसभा निहाय मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार प्रतिनिधी नेमण्यात आला आहे. उमेदवार प्रतिनिधींना नेमलेल्या विधानसभा मतदारसंघाच्याच मतमोजणी केंद्रासमोर थांबता येणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त अन्य विधानसभा मतदारसंघासमोर त्या प्रतिनिधीला थांबता येणार नाही.

  • पाच विधानसभा मतदारसंघांची होणार व्हीव्हीपॅट मोजणी
    यावर्षीपासून प्रथमच व्हीव्हीपॅटची मोजणी होणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी होणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनची मतमोजणी आणि शेवटी व्हीव्हीपॅटची मोजणी होणार आहे. चिट्ठ्या मोजण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे मुख्य निकालासाठी उमेदवरांना थोडा धीर धरावा लागणार आहे. मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता यामुळे तपासली जाणार आहे.

file photo

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.