Balewadi: मावळ लोकसभा मतदारसंघाची 84 टेबलांवरुन होणार मतमोजणी

मतदान यंत्रे टस्ट्राँग रुम' मध्ये सुरक्षित; केंद्रीय, राज्य राखीव अन्‌ स्थानिक पोलीस तैनात

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन (मतदान यंत्रे) बालेवाडी क्रीडासंकुलातील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून 23 मे रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 84 टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी, रनर, कोतवाल असे सुमारे एक हजार कर्मचारी मतमोजणीसाठी असणार आहेत. मतमोजणी कर्मचा-यांना 16 आणि 22 मे 2019 रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघानिहाय मतमोजणीसाठी 14 टेबल असणार आहेत. तर, पोस्टल मतदानासाठी 8 टेबल असे एकूण 92 टेबल असणार आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा आहे. त्यासाठी जागेची थोडी समस्या असून ती मार्गी लागेल असे कविता द्विवेदी यांनी सांगितले.

  • मतमोजणीच्या एका टेबलवर चार अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवक्षेक, सहाय्यक पर्यवक्षेक आणि एक शिपाई असे चार कर्मचारी एका टेबलवर असतील.

ईव्हीएम मशिन ने-आण करण्यासाठी रनर, स्ट्राँग रुमसाठी, वाहतूक, खान-पान सुविधेसाठी, कोतवाल असे एकूण सुमारे एक हजार कर्मचारी मतमोजणी दिवशी कार्यरत असणार आहेत. पुरेशे कर्मचारी उपलब्ध आहेत. मतमोजणी कर्मचा-यांना 16 आणि 22 मे रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील पाच ‘व्हीव्हीपॅट’ मशिनची तपासणी केली जाणार आहे.

  • निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. केंद्रीय राखीव पोलीस, राज्य राखीव पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस असे तीन टप्पे आहेत. तीनही ठिकाणी तपासणी केली जाते. सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस ओळखपत्राची तपासणी करतात. त्यानंतर राज्य राखीव पोलिसांकडून यंत्रांच्या माध्यमातून तपासणी केली जाते.

केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे मोबाईल, इतर वस्तुंची तपासणी केली जाते. याशिवाय चारही बाजूंनी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्यात आलेले आहे. मतमोजणी कक्षात कोणालाही मोबाईल आतमध्ये नेण्यास परवानगी नाही. निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान अधिकारी कोणीही मोबाईल आतमध्ये नेऊ शकत नाही, असेही द्विवेदी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.