Mhalunge-Balewadi: महाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलातील ‘स्ट्राँग रुम’मध्ये मतदान यंत्रे सुरक्षित

एमपीसी न्यूज – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून दोन्ही मतदारसंघातील ईव्हीएम मशीन (मतदान यंत्रे) महाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलातील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरक्षितपणे रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

विधानसभा निवडणुकीचे सोमवारी मतदान संपल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन या त्यांच्या- त्यांच्या स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आल्या. त्यानंतर तेथून गेलेल्या ईव्हीएम, परत आलेल्या ईव्हीएम याची मोजणी झाली. सर्व व्यवस्थित असल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रत्येक बुथनिहाय ईव्हीएम मशीन सील बंद करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया चालत होती. त्यानंतर सुरक्षेच्या घे-यात बोलवाडी येथील क्रीडा संकुल येथील स्ट्राँग रूममध्ये पोहोचवण्यात आले.

त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था
महाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलातील क्रीडांगणांचा वापर स्ट्राँग रुम म्हणून केला आहे. दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. या गोदामाच्या चारही बाजूंनी कटेकोट बंदोबस्त आहे. दोन्ही स्ट्राँग रुम त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेने वेढले आहे. सर्व प्रथम जे मुख्य गोदाम आहे, ते केंद्र सरकारच्या अखत्यारित येणा-या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सुरक्षा घे-यात आहे.

त्यानंतर चारही बाजूंनी राज्य राखीव पोलीस दलाचा घेरा आहे. तर, राज्य पोलिसांचा परिसरात वेढा आहे. याशिवाय चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. इतकेच नव्हे तर ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत. तिथे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुठल्याही प्रकारची ‘लाईव्ह वायरिंग’ नाही. संपूर्ण गोदाम हे अंधारात राहीत. आतमध्ये कुठल्याही प्रकारची ‘लाईट’सुद्धा लावण्यात आलेली नाही.

गुरुवारी होणार मतमोजणी
शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी गुरुवारी (दि. 24) होणार आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील मतमोजणी बालेवाडीतील क्रीडा संकुल परिसरातच गुरुवारी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.