Pune News : बाकडे, बादल्या, पिशव्या, ओपन जीम साहित्य खरेदीवर बंदी

चमकोगिरीवर चाप लावण्यासाठी पुणे महापालिकेचा धोरणात्मक निर्णय 

एमपीसी न्यूज : पुणेकरांच्या कररुपी पैशांतून खरेदी केलेल्या पिशव्या, बाकडे, कचरा बादल्या, पिशव्या, ओपन जीमच्या माध्यमातून नगरसेवकांच्या चमकोगिरीला आता चाप बसणार आहे. वाढती मागणी आणि आर्थिक टंचाईमुळे यापुढे वरील सर्व साहित्यांची खरेदी न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना संकटातही महापालिका प्रशासनाकडे पिशव्या, बाकडे आणि जीम साहित्य खरेदी सुमारे 40 नगरसेवकांचे प्रस्ताव आले होते. यासाठी जवळपास 12 ते 15 कोटी रुपयांची खरेदी करावी लागणार होती, मात्र ही खरेदीच रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

जनतेच्या पैशातून खरेदी केलेल्या पिशव्या, कचरा बादल्या, बाकडे, ओपन जीमचे अक्षरश: पेव फुटले होते. मिळेल त्या जागेत ओपन जीम, बाकड्यांवर ‘संकल्पना’ नामफलकासह पक्षाच्या झेंड्यांचे रंग, निवडणूक चिन्ह छापून राजकीय प्रचार केला जात होता. ओपन जीम तर एकदा

उद् घाटन, पोस्टरबाजी आणि पेपरबाजी झाली की दुरावस्था झाल्यावर देखभाल दुरूस्तीचे खापर महापालिका प्रशासनावर फोडले जात होते. एकदा साहित्य बसवल्यानंतर त्याच्या देखभाल दुरूस्तीकडे ना नगरसेवक लक्ष देतात, ना साहित्य बसवणारी कंपनी. त्यातच निविदेपासून साहित्य खरेदी ते बसविण्यामध्ये ठेकदार आणि माननीयांची ‘तेरी मेरी यारी अपनी सबकी टक्केवारी’ अशी अजब दुनियादारीचे शेकडो प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर उलट ‘कोण म्हणतं टक्का दिला’ असा प्रतिप्रश्न माननीयांकडून पुन्हा नव्या साहित्यखरेदीसाठी आग्रह धरला जात होता.

 याशिवाय नगरसेवकांकडून प्रभागामध्ये वाटप केल्या जाणार्‍या कापडी पिशव्या, बाकडे, कचऱ्याच्या लहान बादल्यांच्या खरेदीवर पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे.

यापूर्वी काही नगरसेवकांनी ‘स’ यादीतून खरेदी केलेली बाकडे आपल्या शेतात, फार्महाऊस, नातेवाईकांच्या घरी, मंगल कार्यालयांसह लोकप्रतिनिधींच्या बंगल्यात  बसवल्याचे काही प्रकार समोर आले होते.

तशाच प्रकारे ओपन जीमचे साहित्य काही नगरसेवकांनी घरात, शेतात व फार्म हाऊसमध्ये बसवल्याची देखील चर्चा आहे. याबाबत जागरूक नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्याने महापालिका प्रशासनाने यापुढे प्रचारकी साहित्यांची खरेदीच न करण्याचा निर्णय घेतल्याचे महापालिकेतील विश्वसनीय सुत्रांनी ‘एमपीसी न्यूज’ला सांगितले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.