Thergaon News : रैनिसांस स्टेट पुस्तकावर बंदी घाला; संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन 

एमपीसी न्यूज – छत्रपती संभाजी महाराज व मातोश्री सोयराबाई यांच्या विषयी गिरीश कुबेर यांनी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या ‘रैनिसांस स्टेट – द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग महाराष्ट्र’ या पुस्तकावर बंदी घालावी. या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी (दि.25) थेरगाव येथे धरणे आंदोलन करण्यात आले. 

गिरीश कुबेर यांनी ‘रैनिसांस स्टेट’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या मातोश्री सोयराबाई यांचा खून केला असे लिहिले आहे. तसेच शाहू महाराजांना दुरदृष्टीचा अभाव असणारे व कृर्तृत्व नसणारे छत्रपती होते. महादजी शिंदें तर विश्वासघातकी, दगाबाज होते. अशा पध्दतीचे आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यामुळे गिरीश कुबेर यांचेवर महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गिरीश कुबेर यांनी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करुन जाणीवपूर्वक दोन समाजामध्ये तेढ निर्माण केला आहे. तसेच, राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकामुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण होऊ शकते त्यामुळे या पुस्तकावर कायमची बंदी घालण्यात यावी तसेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली पुस्तके शासनाने ताब्यात घ्यावीत. गिरीश कुबेर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड डांगे चौक, थेरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करून वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुंजीर, संघटक ज्ञानेश्वर लोभे, मराठा सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष वाल्मिक माने, सचिव सचिन दाभाडे, हरीष मोरे, दिपक खैरनार, सतिश कदम, रशीद सय्यद, सागर तापकीर, अभिषेक म्हसे, योगेश साळवी, महेश कांबळे, प्रकाश पठारे, निलेश शेडगे, हरीषचंद्र तोडकर, मुकेश बोबडे, अमोल कांबळे, आकाश पवार, साहेबराव साळुंखे, रविंद्र चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव स्वराज्य अभियानाचे मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे, अपना वतन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिद्दीक शेख, ओबीसी महासंघाचे सुरेश गायकवाड, विशाल जाधव यांनी निषेध व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.