Baner Crime News : व्हॉटसॲपवरुन महिलांना अश्लिल मेसेज व व्हिडिओ कॉल करणारा चहावाला जेरबंद

एमपीसी न्यूज – वेगवेगळ्या व्हॉटसॲपवरुन महिलांना अश्लिल मेसेज व व्हिडिओ कॉल करणा-या चहा विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी चहाच्या दुकानात चार्जिंगला लावलेल्या कामगारांच्या मोबाईलमधून नंबर चोरत असे व त्यावर अश्लिल मेसेज व व्हिडिओ कॉल करीत असे‌. दरम्यान, रविवारी (दि.30) पोलिसांनी त्याला अटक केली.

संपत शंकर राम (रा. बाणेर, मुळगाव- जोधपूर, राजस्थान) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या जवळून दोन मोबाईल व पाच सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे बाणेरमध्ये रामदेव सुपर मार्केटजवळ चहाचे दुकान आहे. या दुकानात कामगार मोबाईल चार्जिंगला लाऊन कामावर जातात. त्यावेळी आरोपी व्हॉटसॲप नसलेल्या सध्या मोबाईलमधून व्हॉटसॲप सुरू करुन आपल्या मोबाईलवर घेत असे व त्यावरुन गुन्हे करत असे. पूर्वी तो फर्निचरच्या दुकानात होता. त्यावेळी आलेल्या ग्राहकांच्या नंबरवर अश्लील मेसेज व व्हिडिओ कॉल करून तो त्रास देत होता.

आरोपीने फिर्यादी महिलेप्रमाणे अन्य महिलांना अशाच पद्धतीने त्रास दिला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना अश्लील मेसेज व व्हिडिओ कॉलद्वारे त्रास झाला असेल त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.